
स्थैर्य, राजाळे, दि. १ नोव्हेंबर : या हंगामात झालेली अतिवृष्टी आणि आर्थिक मंदीचा दुहेरी फटका सातारा जिल्ह्यातील रोपवाटिका उद्योगाला बसला आहे. कोरेगाव, खटाव, कऱ्हाड, वाई आणि माण तालुक्यांतील अतिवृष्टीमुळे तसेच इतर तालुक्यांतही झालेल्या पावसामुळे शेतीची मशागत खोळंबली. त्यातच बाजारभावाच्या अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांनी भाजीपाला, फुले, फळझाडे आणि ऊस रोपांची मागणी मोठ्या प्रमाणात घटवली आहे. यामुळे रोपे विकली न गेल्याने व्यावसायिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून, लाखो रुपयांची रोपे फेकून देण्याची वेळ आली आहे.
मागील काही महिन्यांतील अनियमित वातावरणामुळे अनेक ठिकाणी शेतकरी हंगामी पिकांसाठी जमीन तयार करू शकले नाहीत. याचा थेट फटका रोपवाटिकांना बसला. तयार रोपे विक्रीअभावी पडून आहेत. अतिवृष्टीमुळे रोपवाटिकांचे आणि पॉलिहाऊसचेही नुकसान झाले. रोपे नाजूक असल्याने ती सडणे, दबणे तसेच बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने मोठे नुकसान झाले आहे. या उद्योगावर अवलंबून असलेले खत विक्रेते, प्लास्टिक ट्रे निर्माते, वाहतूकदार आणि कृषी सल्लागार यांनाही याचा फटका बसला आहे.
या पार्श्वभूमीवर, शासनाने रोपवाटिका उद्योगाला तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी जोर धरत आहे. झालेल्या नुकसानीचे कृषी आणि महसूल विभागाने तात्काळ संयुक्त पंचनामे करावेत, अशी मागणी होत आहे. तसेच, न खपलेल्या व सडलेल्या रोपांसाठी बियाणे, खते, कोकोपीट आणि मजुरीच्या खर्चावर आधारित विशेष ‘निविष्ठा अनुदान’ द्यावे, कर्जाचे पुनर्गठन करावे, वीज बिलात सवलत द्यावी आणि भविष्यातील नुकसानीसाठी शेडनेट व पॉलिहाऊसचे अनुदान वाढवावे, अशा मागण्या रोपवाटिका व्यावसायिकांकडून केल्या जात आहेत.

