सातारा जिल्याने निसर्ग चक्रीवादळाचा घेतला अनुभव

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


सदरबझार येथे झाड कोसळले ; यवतेश्‍वर घाटात दगड रस्त्यावर : महाबळेश्‍वर, पाटण, जावली, वाई तालुक्याला पावसाचा तडाखा

स्थैर्य, सातारा, दि. 3 : निसर्ग चक्रीवादळाचा अनुभव आज सकाळपासूनच सातारकरांनी घेतला. कोरोनाचे संकट राज्यावर घोंगावत असतानाच आज निसर्ग चक्रीवादळाने कोकण किणारपट्टीला जोरदार तडाखा दिला. या चक्रीवादळाचा परिणाम राज्याच्या इतर भागातही जाणवला. जिल्ह्यात आज सकाळपासूनच वादळासह मुसळधार पावसाने सातारा शहर व तालुक्यासह महाबळेश्‍वर, पाटण, जावली, वाई या तालुक्यांना चांगलाच तडाखा दिला. जोराचा वारा व मुसळधार पावसामुळे  सदरबझार येथे रस्त्यावर झाड कोसळले तर यवतेश्‍वर घाटात छोटे छोटे दगड रस्त्यावर आले. सुदैवाने कोठेही मोठी दुर्घटना घडली नाही. दरम्यान, गेले दोन दिवस खरेदीसाठी झुंबड उडवणार्‍या सातारकरांनी आज घरीच थांबणे पसंत केल्यामुळे त्यांनी कोरोनापेक्षा निसर्ग वादळाचाच अधिक धसका घेतल्याचे स्पष्ट झाले.

कोकण किणारपट्टीला प्रामुख्याने अलिबाग, श्रीवर्धन या भागाला निसर्ग चक्रीवादळाने झोडपून काढले. या चक्रीवादळाचा राज्यात दूरपर्यंत परिणाम जाणवला. सातारकरांनीही त्याचा अनुभव घेतला. आज सकाळपासूनच वादळी वारे आणि त्यापाठोपाठ पाऊस कोसळण्यास सुरुवात झाल्यानंतर सातारकरांची एकच पळापळ सुरू झाली. भाजी, फळविक्रेते, फूटपाथवर लावलेल्या दुकानदारांनी आडोसा शोधण्यास सुरुवात केली. पहिले तीस मिनिटे संततधार पडणार्‍या पावसाने मुसळधार स्वरूप प्राप्त केले. त्यामुळे काही वेळातच सर्वत्र पाणीच पाणी झाले. खबरदारीचा उपाय म्हणून वीज वितरण कंपनीने सातारा शहरासह उपनगरातील वीज खंडित केली होती. मुसळधार पावसाने शहरातील ओढे, नाले तुडुंब भरून वाहत होते. संभाजीनगर, विलासपूर, कोडोली, गोडोली, एमआयडीसी, शाहूपुरी, मोळाचा ओढा, खेड, संगममाहुली, क्षेत्रमाहुली, सोनगाव, खावली, महागाव परिसरात दुपारी दोन वाजेपर्यंत मुसळधार पाऊस पडत होता. पावसामुळे नदी पात्राच्या पाण्यात चांगलीच वाढ झाली.

जोराचा वारा आणि पावसामुळे सदरबझार येथील जिल्हा रुग्णालय चौकात रस्त्यावरच झाड पडल्याने काही वेळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. मात्र याबाबतची माहिती मिळताच संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांनी तातडीने ते झाड हटवत वाहतूक सुरळीत केली. यवतेश्‍वर घाटात पावसामुळे रस्त्यावर छोटे छोटे दगड आल्याची घटना वगळता कोठेही अनर्थ घटना घडली नाही.

जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात म्हणजे महाबळेश्‍वर, पाटण, जावली व वाई या तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता. सातारा, कोरेगाव, फलटण आणि खंडाळा या तालुक्यातही चांगला पाऊस झाला. गुरुवारपर्यंत हे वातावरण असेच राहणार असल्याने जिल्हा प्रशासनाने काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत.

सातार्‍यात अनेक दुकाने बंदच

निसर्ग वादळाच्या पार्श्‍वभूमीवर सातारा जिल्हा प्रशासनाने मंगळवारीच सातारकरांना दक्षता घेण्याच्या सूचना केल्या होत्या. या वादळाचे गांभीर्य लक्षात घेऊन बहुतांश सातारकरांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. राजवाडा, मोती चौक, बॉम्बे रेस्टॉरंट, पोवई नाका, बस स्थानक येथील बहुतांश दुकाने बंदच होती. दुसरीकडे सातारकरांनी निसर्ग वादळाचा धसका मोठ्या प्रमाणावर घेतल्यामुळे घराबाहेर पडणे टाळल्यामुळे वाहतूक सुरू होती.

बॉम्बे रेस्टॉरंटजवळ जाहिरात फलक कोसळला

वादळी वार्‍यासह सकाळी अचानक पावसाला सुरुवात झाल्यानंतर दुचाकीवरून प्रवास करणार्‍या नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. त्यापैकी अनेक वाहनचालकांनी बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील उड्डाणपुलाखाली थांबणे पसंत केले. धो-धो पाऊस पडत असतानाच उड्डाणपुलाच्या वरील महामार्गावर असलेले पाणी खाली पडू लागल्यामुळे नागरिकांमध्ये काही वेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले त्यातच नजीकच असलेल्या एका दुकानावरील जाहिरात फलक पडल्यामुळे अनेकांनी उड्डाणपुलाखाली न थांबता दुचाकीवरून निघून जाणे पसंत केले.

कास परिसरात जोरदार पाऊस, झाड रस्त्यावर

कास परिसरात मंगळवार दुपार पासुन पावसाला सुरवात झाली असुन बुधवारी आलेल्या चक्रीवादळामुळे हवेचा वेग जोरात असल्याने सातारा कास रोडवर अनेक ठिकाणी झाडे उन्मळुन पडल्याने वाहतुकीस अडचण निर्माण झाली होती

पावसाने मंगळवारी दुपारी हजेरी लावुन जिल्हयातील पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या कास बामणोली परळी परिसरात मंगळवारी रात्री रिमझीम तर बुधवारी सकाळपासुन जोरदार बँटीग करत दमदार आगमन केले पावसाबरोबर आलेल्या चक्रीवादळामुळे बुधवारी दुपारी कास रोडवर पेट्री देवकल व पारांबे गावाजवळ झाडे उन्मळुन पडल्याने वाहतुकीस अडचण निर्माण झाली होती विज वाहक तारा लोबंकळत असल्याने कोरोनाच्या संकटामुळे तुरळक सुरु असणारी वाहतुकही खोळंबली होती. पेट्री विभागावर कार्यरत असणारे वायरमन सुतार यांनी तात्काळ हजर होऊन लोंबकळणारी विजवाहक तार हटवल्याने वाहतुक पुन्हा सुरु झाली पहिल्याच पावसाने पहिल्याच दिवशी परिसराला झोडपुन काढले असुन ओढे नाले दुतडी भरून वाहत असुन परिसरात असणारे छोठेमोठे धबधबे ओसंडुंन वाहत आहेत सकाळपासुनच भागातील विजपुरवठा खंडीत झाला असल्याने जनता अंधारात आहे वादळाने अनेक गावातील घरांचे पत्रे व कौले उफसुन टाकल्याने नुकसानीच्या किरकोळ घडल्या आहेत.

जावली तालुक्यात वार्‍यासह पाऊस

जावली तालुक्यात मंगळवारी रात्रीपासून वादळी वार्‍यासह पावसाच्या जोरदार सरीकोसळल्या. या दरम्यान कुडाळसह अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळल्याने वीज प्रवाह खंडित झाला.

अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने किरकोळ नुकसान झाले. कुडाळ-पाचगणी रस्त्यावर झाड पडल्याने काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली. काही ठिकाणी विजेच्या तारांवर झाडांच्या फांद्या पडल्या. दुपारनंतर पावसाचा व वार्‍याचा वेग मंदावला. परंतु  अधूनमधून पावसाच्या मोठ्या सरी येत होत्या.

पाचगणीत पावसाने हाहाकार: वृक्ष पडल्याने वीज पुरवठा खंडित

आज सकाळपासूनच सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले. काटवली येथे एका घराचे छप्पर उडून गेले तर एक घराची भिंत पडल्याने मोठे नुकसान झाले. पाचगणी शहरात ठिकठिकाणी मोठमोठे वृक्ष उन्मळून पडल्याने विजेच्या तारा तसेच घरांचे मोठे नुकसान झाले आहे.

बुधवारी सकाळीच निसर्ग या वादळाचे आगमन होणार म्हणून वीज वितरणने संभाव्य धोका ओळखून वीज पुरवठा खंडित केला होता. जोरदार वारे आणि मुसळधार पाऊस यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले होते. काटवली येथील शामराव बेलोशे यांचे घराचे पूर्ण छप्पर वार्‍याने उडून शेजारच्या घरावर कोसळले. वीज पुरवठा खंडित असल्याने आणि घराच्या एका बाजूला ते पडल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही तर बापूराव बेलोशे त्यांच्या राहत्या घराची भिंत कोसळल्याने या कुटुंबाचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, पाचगणी शहरात ठिकठिकाणी मोठमोठे वृक्ष उन्मळून पडल्याने विजेच्या तारा तसेच घरांचे मोठे नुकसान झाले आहे. जोरदार वारे वाहू लागल्याने नागरिकांनी घरातच राहणे पसंत केले. पाचगणी शहरात कालपासूनच वीज पुरवठा खंडित झाला आहे. पावसामुळे रस्ते जलमय झाले होते. कोरोना संकटानंतर उघडलेली बाजारपेठ पुन्हा एकदा निर्मनुष्य झाली.

कराड तालुक्याला वार्‍यासह मुसळधार पावसाने झोडपले

अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली; ऊस पिकांचे मोठे नुकसान

कराड शहरासह तालुक्यात गेल्या तीन दिवसापासून वादळी वार्‍यांसह आलेल्या अवकाळी पावसाने झोडपून काढले. अरबी समुद्रात निसर्ग चक्रीवादळ निर्माण झाल्याने काल सकाळपासून सोसाट्याच्या वादळी वारा व मुसळधार पावसाने कराडसह तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले. या वादळी वार्‍यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मुळून पडली आहेत तर ऊस भुईसपाट होऊन ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  काही भागात घरावरील पत्रे, विद्युत खांब कोसळून पडले आहेत. दिवसभर पावसाच्या सरीवर सरी कोसळून वादळी वार्‍याने थैमान घातले.

अगोदरच कोरोनाच्या संकटात असलेल्या कराड तालुक्यावर हवामान खात्याने दिलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या इशार्‍यामुळे भीतीचे संकट उभे राहिले होते. सुरवातीला सोसाट्याच्या वार्‍याची गती काहीशी कमी प्रमाणात होती. सोबत पावसाच्या हलक्या सरी पडू लागल्या. मात्र बुधवारी पहाटे पासून वादळी वार्‍याने आपले खरे रूप दाखवायला सुरुवात केली. भरधाव गतीने येणार्‍या वादळी वार्‍याने अनेक झाडे उन्मळून पडली तर वीज पुरवठा काही काळासाठी बंद करावा लागला. सोबत धो-धो पडणार्‍या पावसाने थैमान घातले. तालुक्यातील मलकापूर, कापील, गोळेश्‍वर, कार्वे, सैदापूर, ओगलेवाडी, बाबरमाची, टेंभू, बनवडी, वारूंजी, मसूर, कोपर्डे हवली, उंब्रज, मालखेड, उंडाळे, रेठरे बुद्रुक, वडगाव हवेली, शामगाव आदी भागाला अवकाळीने झोडपले.

डोंगरी भागात धूळवाफ पेरणी केली असली तर अजून बहुतांशी भुईमूग व सोयाबीन व कडधान्याची पेरणी केली नसल्याने शेतकरी बळीराजा हवालदिल झाला आहे. काही भागात शेतकर्‍यांची शेतीची कामे पूर्ण झाली नाहीत. धूळवाफ पेरणीमधील भात शेतीसाठी उपयुक्त असलेला पाऊस मात्र इतर पिकांसाठी नुकसानीचा ठरला आहे.

जोरदार येणार्‍या वादळी वार्‍याने ऊस शेती भुईसपाट झाल्याच्या घटना घडल्या आहेत तर खरीप हंगामातील भुईमूग व सोयाबीन पेरणीसाठी पेरणी पूर्व मशागतीचा खोळंबा झाला आहे. या वादळी पावसाच्या वातावरणात जर मान्सूनचा पाऊस सुरू झाला तर खरीप हंगामातील भुईमूग व सोयाबीन इतर कडधान्याची पेरणी कशी करणार असा प्रश्‍न बळीराजासमोर पडला आहे.

दरम्यान, मसूर, हेळगाव परिसरात मंगळवारी व बुधवारी झालेल्या पावसाने आडसाली उसासह माळव्याच्या पिकांचे नुकसान झाले. परिसरात ठिकठिकाणी झाडाच्या फांद्या मोडून पडल्या होत्या तर हेळगाव येथे घरावर मोठे झाड उन्मळून पडल्याने घराचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. निसर्ग चक्रीवादळामुळे व गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसाने शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. आडसाली उसाचे पीक जोरदार वार्‍यामुळे आडवे झाले आहे. परिसरातून गेलेल्या आरफळ कालव्या-मुळे परिसरात वांगी, टोमॅटो, भेंडी, गवारी आदी माळव्याची पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. त्याचेही नुकसान झाले आहे. दरम्यान हेळगाव येथील अर्जुन घोरपडे यांच्या घरासमोर असलेले वाळवीचे झाड उन्मळून घरावरच पडल्याने घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान मंगळवार व बुधवार दोन्ही दिवस दिवसभर वीज पुरवठा खंडित झाला होता. बुधवारी उशिरापर्यंत पाऊस सुरू होता.

पाटण तालुक्याला वार्‍यासह मुसळधार पावसाने झोडपले

अगोदरच कोरोनाच्या संकटात असलेल्या पाटण तालुक्यावर हवामान खात्याने दिलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या इशार्‍यामुळे  भीतीचे संकट उभे राहिले होते. मात्र चक्रीवादळापासून तालुक्याची सुटका झाली. मात्र बुधवारी रात्रीपासूनच तालुक्याला मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले. चक्री नव्हे पण घोंघावणारे वारे आणि मुसळधार पावसाचा तडाखा यामुळे पाटण तालुका गारठून गेला असून पावसाळ्यापूर्वीच तालुक्यात आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

दरम्यान, निसर्ग चक्रीवादळाच्या इशार्‍यामुळे पाटणसह परिसरातील लोक दिवसभर घरातच बसून होते. त्यामुळे रस्त्यावर सर्वत्र शुकशुकाट पसरला होता. पाटण तालुक्यात कोरोनासारख्या महामारीचे संकट सुरू असताना त्यातच हवामान खात्याने आणि जिल्हा प्रशासनाने निसर्ग चक्रीवादळाने संभाव्य नुकसान होण्याची शक्यता गृहीत धरून तालुक्यातील सर्व विभागांनी सतर्क राहून उपाययोजना राबवाव्यात असा सतर्कतेचा इशारा देऊन जिल्ह्यातील महाबळेश्‍वर, जावळी, वाई आणि पाटण तालुक्याला अलर्ट राहण्याच्या सूचना मंगळवारी रात्रीच दिल्या होत्या. त्यामुळे पाटण तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणेबरोबरच नागरिकही अलर्ट होते.

खर्‍या अर्थाने 1 जूनपासूनच पाटण तालुक्यात पावसाने हजेरी लावली आहे. मात्र बुधवारी हवामान खात्याने इशारा दिल्यानुसार बुधवारी पहाटेपासूनच पाटणसह कोयना, ढेबेवाडी, नवारस्ता, मल्हार-पेठ, तारळे, केरा, मोरगिरी विभागात चक्रीवादळ कमी आणि घोंघावणारा वारा आणि मुसळधार पावसाचा कहर पहायला मिळाला. यामुळे तालुक्यातील नागरिकांना पावसाळ्यातील पूरपरिस्थिची जाणीव झाली. बुधवारी पहाटेपासून सायंकाळी उशिरापर्यंत मुसळधार पावसाची संततधार सुरूच होती. शिवाय निसर्ग वादळाचा पाटण तालुक्याला तडाखा बसतोय की काय या भीतीने दिवसभर तालुक्यातील नागरिक भीतीच्या छायेखाली होते.  लोक घराबाहेर न येता घरातच बसून होते. त्यामुळे रस्त्यावर सर्वत्र शुकशुकाट पसरला होता.

निसर्ग वादळ मुंबईऐवजी पुणेकडून उत्तर महाराष्ट्रात सरकल्याने पाटणवासीयांनी दिवसभर रोखलेला श्‍वास सोडला. मात्र चक्रीवादळा ऐवजी मुसळधार पावसाने तालुक्यात जोरदार हजेरी लावून तालुक्याला झोडपून काढले. सलग बारा तास कोसळत असलेल्या या पावसामुळे तालुक्यातील ओढे, नाले भरून वाहू लागले. परिणामी कोयना, मोरणा, केरा या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून वातावरणात प्रचंड गारठा निर्माण झाला आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!