
भारत सरकारच्या ‘जनगणना २०२७’ साठी सातारा जिल्ह्यात प्रशासकीय तयारीला वेग आला आहे. ही जनगणना दोन टप्प्यांत आणि प्रथमच डिजिटल ॲपद्वारे होणार असून, नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.
स्थैर्य, सातारा, दि. १० एप्रिल : भारत सरकारतर्फे होणाऱ्या ‘जनगणना २०२७’ साठी देशभरात व्यापक तयारी सुरू करण्यात आली असून, सातारा जिल्ह्यातही प्रशासनाने या तयारीला वेग दिला आहे. जनगणना ही देशातील सर्वात मोठ्या प्रशासकीय आणि सांख्यिकीय उपक्रमांपैकी एक असून, शासनाच्या धोरणनिर्मिती व विकास नियोजनासाठी ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते. सन १८७२ पासून सुरू झालेल्या परंपरेतील ही १६ वी, तर स्वातंत्र्यानंतरची ८ वी जनगणना ठरणार आहे.
प्रथमच ‘डिजिटल’ जनगणना आणि गोपनीयतेची हमी
यंदाच्या जनगणनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, देशाच्या इतिहासात प्रथमच मोबाईल ॲपच्या माध्यमातून डिजिटल माहिती संकलन करण्यात येणार आहे. यामुळे ही प्रक्रिया अधिक जलद, अचूक आणि पारदर्शक होण्यास मदत होईल.
जनगणनेदरम्यान संकलित केलेली प्रत्येक नागरिकाची वैयक्तिक माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल आणि तिचा वापर केवळ सांख्यिकीय उद्देशासाठीच केला जाईल, अशी महत्त्वपूर्ण माहिती जिल्हा जनगणना अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी दिली आहे.
दोन टप्प्यांत पार पडणार जनगणना :
-
पहिला टप्पा (घरयादी व घरगणना) : १ मे ते १४ जून २०२६
-
स्वगणना (Self-Enumeration) : १ मे ते १५ मे दरम्यान नागरिकांना https://se.census.gov.in या संकेतस्थळावर स्वगणनेचा पर्याय उपलब्ध असेल. याद्वारे नागरिक स्वतः घराची स्थिती, सुविधा आणि मालमत्तेची माहिती ऑनलाइन भरू शकतील.
-
प्रगणकांद्वारे माहिती संकलन : १६ मे ते १४ जून या कालावधीत प्रगणक (Enumerator) आपल्या नेमून दिलेल्या HLB गटाला प्रत्यक्ष भेट देऊन ‘HLO App’ वर १ ते ३४ प्रश्नांची माहिती संकलित करतील.
-
-
दुसरा टप्पा (प्रत्यक्ष लोकसंख्या गणना) : फेब्रुवारी २०२७
-
या दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष लोकसंख्येची गणना केली जाईल. यामध्ये व्यक्तीचे वय, लिंग, शिक्षण, व्यवसाय तसेच इतर सामाजिक व आर्थिक बाबींची नोंद घेतली जाईल.
-
५००० प्रगणक आणि अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण
सातारा जिल्ह्यातील जनगणना पूर्वतयारीसाठी ४ ते ६ मार्च २०२६ या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयात २७ चार्ज ऑफिसर (Charge Officer), टेक्निकल असिस्टंट व जनगणना महसूल सहाय्यक यांचे विशेष प्रशिक्षण पार पडले. ग्रामीण भागासाठी संबंधित तहसीलदार, तर शहरी भागासाठी मुख्याधिकारी हे ‘चार्ज ऑफिसर’ म्हणून काम पाहणार आहेत.
संपूर्ण जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील जनगणनेचे काम सुमारे ५००० प्रगणकांमार्फत केले जाणार आहे. या प्रगणकांना आणि पर्यवेक्षकांना मोबाईल ॲप व आधुनिक डिजिटल साधनांचा वापर करण्याचे विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
या राष्ट्रीय कार्यात सातारा जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी ‘जनगणना २०२७’ मध्ये आपला सक्रिय सहभाग नोंदवून गणना करण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.

