साफसफाई कामगारांसाठी जीवनावश्यक अन्नधान्याचे कीटचे वाटप
स्थैर्य, सातारा, दि. 03 : कोरोनाच्या संकटामुळे अनेकजण बेरोजगार झाले असून अर्थव्यवस्था विस्कळीत झाली आहे. देशात व राज्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असूनसामाजिक बांधिलकीतून सातारा जिल्हा बँकेने स्व. व्ही.डी. सावरकर स्वयंरोजगार सहकारी संस्थेच्या बँकेतील साफसफाई करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांचे दैनंदिन उदरनिर्वाहासाठी जीवनावश्यक अन्नधान्याचे कीट उपलब्ध करून दिले आहे. या कीटचे वितरण बँकेचे अध्यक्ष आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे हस्ते करणेत आले. याप्रसंगी बँकेचे संचालक प्रकाश बडेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक राजीव गाढवे, राजेंद्र भिलारे व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बँकेचे अध्यक्ष आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनामार्फत उपाययोजना सुरु असून सामाजिक बांधिलकीतून सातारा जिल्हा बँकेने सर्वसाधारण १७५०० किटचे वितरण जिल्ह्यातील शेतमजूर, कामगार तसेच दारिद्र्य रेषेमध्ये नाव समाविष्ठ नसलेल्या व सरकारकडून कोणत्याही प्रकारचे रेशन न मिळालेल्या गरजू कुटुंबाना वितरण केले आहे. या किटमध्ये तेल, तांदूळ , साखर, तांदूळ, चटणी, हळद, गहू आटा इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असून या जीवनावश्यक किटसाठी बँकने रक्कम रु. १ कोटी खर्च केले आहेत. तसेच रक्कम रु. १ कोटीची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस केलेली आहे. याव्यतिरिक्त सातारा जिल्हा बँकेच्या मा. संचालक मंडळ सदस्यांचा सभाभत्ता व बँक अधिकारी/सेवक यांचे १ दिवसाचे वेतन रु .१६ लाखाची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस करणेत आली. बँकेने महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये ज्या-ज्या वेळी नैसर्गिक आपत्ती आली आहे, त्या-त्या वेळी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आर्थिक तसेच विविधरूपाने सर्वतोपरी मदत केलीली आहे.
यावेळी डॉ .राजेंद्र सरकाळे म्हणाले सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक देशातील जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये अग्रगण्य बँक आहे. स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांची जोपासना करणारी ही बँक असून बँकिंग कामकाजाबरोबर सामाजिक बांधिलकीही जपत आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून बँकेने ज्या वेळी देशात किंवा राज्यात नैसर्गिक आपत्ती आली आहे त्या वेळी सर्वोतोपरी विविधरुपाने मदत केली आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखणेसाठी बँक शाखा व मुख्य कार्यालय पातळीवर जरुर त्या उपाययोजना केल्या आहेत. शाखा सेवकांना मास्क, सॅनिटायझर तसेच ग्राहकांकरिता हात धुणेसाठी साबण, पाणी, सॅनिटायझर इ .ची सुविधा उपलब्ध केली आहे.
शासनस्तरावरुन दिलेल्या सूचनांची बँक प्रभावी अंमलबजावणी करीत असून कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्राहकामध्ये जनजागृती निर्माण केली आहे . बँकेच्या ग्राहकांच्या सोईसाठी जिल्हयात विविध ठिकाणी ४७ एटीएम कार्यान्वित असून ६५० मायक्रो एटीएमचे माध्यमातून जिल्हयातील दुर्गम भागातील ग्राहकांना घरपोच बँकिंग सेवा पुरविली जात आहे . ग्राहकांनी बँकेच्या ऑनलाईन पध्दतीने बँकिंग सेवेचा लाभ घ्यावा व शाखेतील गर्दी कमी करावी असे आवाहन डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी केले .