स्थैर्य, सातारा, दि. २६ : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. देशात व राज्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणेसाठी सातारा जिल्हा मध्य. सहकारी बँकेने आर्थिक मदतीसह विविध उपाययोजना केलेल्या आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती मार्फत जिल्हा बँकेस ‘कोव्हीड योद्धा’ म्हणून सन्मानित केले. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी समितीचे विभाग प्रचारक श्री. केदार कुलकर्णी यांचे हस्ते सन्मानपत्र स्वीकारले. यावेळी समितीचे जिल्हा कार्यवाहक श्री. मुकुंद आफळे, जिल्हा सदभाव संयोजक श्री. चंद्रकांत धुळप तसेच बँकेचे सरव्यवस्थापक श्री. राजीव गाढवे तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
सातारा जिल्हा बँक, बँकींग कामकाजाबरोबर विकासाभिमुख कार्यात बँक नेहमीच अग्रेसर असते. बँकेने महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये ज्या-ज्या वेळी नैसर्गिक आपत्ती आली आहे, त्या-त्या वेळी आर्थिक मदत केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मा .संचालक मंडळाच्या निर्णयानुसार बँकेच्या मा. संचालक यांचा सभा भत्ता व बँक अधिकारी व कर्मचारी यांचे एक दिवसाचे वेतन अशी एकूण रक्कम रु. १६.०० लाख तसेच सन २०१९-२० च्या ढोबळ नफ्यातून रक्कम रु .१.०० कोटीचा निधी मा .मुख्यमंत्री सहाय्यता निधीस धनादेशाद्वारे मा .जिल्हाधिकारीसो यांचेकडे जमा केलेली आहे. या व्यतिरिक्त जिल्हयातील स्थलांतरीत, मोल मजूरी करणारे मजूर/शेत मजूर व गरजू कुटुंबांना त्यांचे दैनंदिन उदरनिर्वाहासाठी जीवनावश्यक अन्नधान्याचे किट उपलब्ध करुन दिले असून यासाठी बँकने अंदाजित रु १.०० कोटी रक्कम खर्च केलेले आहेत.
बँक शाखांवर नियोजन व नियंत्रण ठेवणेसाठी संबंधित तालुक्याचे विभागीय विकास अधिकारी व मुख्यालयामार्फत एक वरिष्ठ अधिकारी यांची नेमणूक केली आहे .शाखेतील दैनंदिन व्यवहारासाठी ग्राहकांची गर्दी टाळणेसाठी शाखा कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावास/वाडीस आठवडयातील दिवस ठरवून दिलेले असून कामकाज सुरु असून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. तसेच ग्राहकांना शाखेमध्ये येताना स्वच्छतेसाठी सॅनिटायझरचा पुरवठा केलेला आहे. शाखेमध्ये सामाजिक विलगीकरणासाठी एका वेळी आवश्यक तेवढयाच ग्राहकांना प्रवेश दिला जात आहे .शाखेच्या वयोवृध्द पेन्शनर व संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत असलेल्या ग्राहकांना बँक सेवकामार्फत घरपोहोच पेन्शन रक्कम दिली जात आहे .
जिल्हयातील सर्व बँक कर्मचा-यांना मास्क, सॅनिटायझर व कॅशियर सेवकांना हॅन्डग्लोजचे वाटप करणेत आलेले आहे . ग्राहकांनी जास्तीत जास्त ऑनलाईन पध्दतीने एटीएम, एनईएफटी, आरटीजीएस व डिजीटल बँकिंग व्यवहार करणे व शाखेमध्ये विनाकारण गर्दी करु नये याबाबतचे आवाहन वृत्तपत्र व नोटीसीद्वारे प्रसिध्द केलेले आहे . बँकेने भारत सरकारचे ‘आरोग्य सेतू अप’ चे महत्व पटवून देऊन ग्राहक व सेवकांना मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे करिता आवाहन केले आहे. शासनाने वेळोवेळी दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करून बँक दैनंदिन कामकाज करीत आहे.
सर्व शाखा व एटीएम मध्ये पुरेशी कॅशची व्यवस्था केलेली आहे . तसेच बँकेच्या ४७ एटीएम मार्फत ग्राहकांना २४ तास सेवा दिली जात आहे . बँकेच्या ३२० शाखांमध्ये निर्जंतुकीकरणासाठी सोडीयम हायड्रोक्लोराईटची फवारणी केलेली आहे .ज्या ठिकाणी बँकिंग सुविधा उपलब्ध नाही त्या वाडी/वस्तीवर तसेच गर्दी होणा-या गावात/बाजारतळावर मोबाईल एटीएम व्हॅनचे माध्यमातून ग्राहकांना बँकिंग सेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत . सातारा जिल्हा परिषद यांचे मार्गदर्शनाखाली बँकेने कोविड-१९ ‘काळजी घ्या घाबरु नका’ ही मार्गदर्शनपर पुस्तिका गावोगावी ग्रामीण भागात पोहचविणेचे काम केलेले आहे . या पुस्तिकेमध्ये कोरोना आजाराबाबत घ्यावयाची काळजी, मास्क व सॅनिटायझरचा वापर कसा करावा तसेच आजारासंबंधी अफवांची माहिती समाविष्ट केलेली आहे यामुळे ग्रामीण भागातील जनतेत कोरोनाबाबत जनजागृती निर्माण होणेस मदत झाली आहे. जिल्हयातील सर्वच नागरीकांनी सामाजिक अंतर ठेवणे, स्वच्छता तसेच विनाकारण बाहेर न पडणेसाठी आणि बँक कर्मचा-यांसाठी आवश्यक ती काळजी घेणेबाबत बँकेचे अध्यक्ष मा .आ .श्रीमंत छ .शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी वृत्तपत्राद्वारे वारंवार आवाहन केलेले आहे.