
राज्यात वाढणाऱ्या तापमानाच्या आणि उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर, सातारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी नागरिकांसाठी उष्माघातापासून बचाव करण्यासाठी महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
स्थैर्य, सातारा, दि. 11 मार्च : राज्यात दरवर्षी वाढणाऱ्या तापमानाचा आणि उष्णतेच्या लाटेचा वाढता प्रभाव पाहता, नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी व संभाव्य धोके टाळण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून विशेष मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी या सूचनांचे काटेकोर पालन करून उष्माघातापासून आपला बचाव करावा, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.
उष्णतेच्या लाटेत ‘काय करावे?’
-
पाण्याचा भरपूर वापर: तहान लागली नसली तरीही दर अर्ध्या तासाच्या फरकाने पुरेसे पाणी प्या. प्रवासात पिण्याचे पाणी नेहमी सोबत ठेवा.
-
पेयांचा वापर: शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस (ORS), घरी बनवलेली लस्सी, कैरीचे पन्हे, लिंबू-पाणी, ताक इत्यादींचा नियमित वापर करा.
-
बाहेर जाताना काळजी: घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करा. उन्हात काम करीत असल्यास टोपी, छत्री किंवा ओल्या कपड्याने डोके, मान आणि चेहरा झाकून घ्या.
-
कपड्यांची निवड: उन्हाळ्यात नेहमी हलके, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत.
-
घराची काळजी: घर थंड ठेवण्यासाठी व सूर्यप्रकाशापासून वाचण्यासाठी घरातील पडदे, शटर आणि सनशेडचा वापर करा. रात्रीच्या वेळी खिडक्या उघड्या ठेवाव्यात. तसेच वेळोवेळी थंड पाण्याने स्नान करावे.
-
उष्माघाताची लक्षणे ओळखा: अशक्तपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत. चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
-
कामाच्या ठिकाणी व्यवस्था: कामगारांसाठी कामाच्या ठिकाणी थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असावी. सूर्यप्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करावे. पहाटेच्या वेळी जास्त कामाचा निपटारा करावा. बाहेर काम असल्यास मध्ये मध्ये विश्रांती घ्यावी. गरोदर स्त्रिया आणि आजारी कामगारांची अधिक काळजी घेण्यात यावी.
-
गुरांची काळजी: गुरांना छावणीत किंवा सावलीत बांधावे आणि त्यांना पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध करून द्यावे.
उष्णतेच्या लाटेत ‘काय करू नये?’
-
दुपारी १२ ते ३ वाजेच्या दरम्यान कडक उन्हात घराबाहेर जाणे आवर्जून टाळा.
-
उन्हात अतिकष्टाची व शारीरिक श्रमाची कामे करू नका.
-
दारू, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेये (Cold drinks) घेणे टाळा.
-
उच्च प्रथिनयुक्त (High protein) आणि शिळे अन्न खाऊ नका.
-
लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात एकटे सोडू नये.
-
गडद रंगाचे, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.
-
कडक उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करणे टाळावे. मोकळ्या हवेसाठी स्वयंपाकघराची दारे व खिडक्या उघड्या ठेवाव्यात.
