सातारा: समशेरसिंहांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार; फडणवीसांकडून कौतुक


सातारा येथे भाजपच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि जयकुमार गोरे उपस्थित होते.

स्थैर्य, सातारा, दि. ०२ जानेवारी : सातारा येथे जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य सोहळ्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फलटणचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर आणि विजयी नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील भाजपच्या यशाचे कौतुक करत मुख्यमंत्र्यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची पाठ थोपटली.

या सत्कार समारंभाला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. फलटण नगरपरिषदेत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर व त्यांच्या सहकाऱ्यांचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला.

विकासासाठी एकजुटीचे आवाहन

नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “स्थानिक स्वराज्य संस्थांमधील भाजपचे यश हे सर्वसामान्यांच्या विश्वासाचे प्रतीक आहे. आता ही जबाबदारी ओळखून सर्वांनी एकत्रितपणे काम करावे आणि विकासकामे गतीने पूर्ण करावीत.”

या समारंभास भाजपा सातारा जिल्ह्याचे पदाधिकारी, विविध लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. फलटणमधील विजयानंतर थेट मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालेल्या या सत्कारामुळे जिल्ह्यातील, आणि विशेषतः फलटणच्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे.


Back to top button
Don`t copy text!