
दैनिक स्थैर्य | दि. २९ सप्टेंबर २०२३ | सातारा |
सातारा शहरातील पत्रकाराला ‘तुला जिवंत सोडणार नाही’, अशी धमकी दिल्याप्रकरणी प्रीतम कळसकर याच्यावर शहर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. खासदार उदयनराजे भोसले यांचा कळसकर हा कार्यकर्ता आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, या प्रकरणी पत्रकार सुजीत आंबेकर (रा. रविवार पेठ, सातारा) यांनी तक्रार दिलेली आहे. त्यानुसार प्रीतम कळसकरवर गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांनी सांगितले की, दि. २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास सातार्यातील शासकीय विश्रामगृहावर केंंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांना खासदार उदयनराजे यांच्याबाबत आंबेकर यांनी प्रश्न विचारला होता. यावरून प्रीतम कळसकरने पत्रकार आंबेकर यांना ‘तुला जीवंत सोडणार नाही, तुला बघून घेतो,’ अशी धमकी दिली. त्यानंतर पत्रकार सुजीत आंबेकर यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी प्रीतम कळसकरविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंद केला आहे. तसेच याप्रकरणी पोलिस अधिकारी अधिक माहिती घेत आहेत.