सातारा शहरातील जबरी चोरी, घरफोड्यांचा छडा सातारा शहर पोलिसांची कामगिरी : महिलेसह तीन संशयितांना अटक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. १९: सातारा शहरात जबरी चोरी तसेच घरफोडीच्या गुन्ह्यांचा शहर पोलिसांनी छडा लावला आहे. एका महिलेसह तिघांना अटक करण्यात आली आहे. सुरज बाळू लोंढे रा. प्रतापसिंहनगर, खेड, ता. जि. सातारा, सुरज राजू माने रा. लक्ष्मी टेकडी, सदर बझार सातारा अशी संशयितांची नावे आहेत. तिन्ही गुन्ह्यांमधील संशयितांकडून सुमारे 70 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी, दि. 15 रोजी सायंकाळी 5 च्या वाजण्याच्या सुमारास महिन्द्रा हॉटेल खेड, ता. जि. सातारा येथे दोन अनोळखी इसमांनी परप्रांतीय युवकास मारहाण करुन त्याच्याजवळील रोख 10 हजार रुपये व ड्रील मशीन असे साहित्य जबरदस्तीने चोरी करुन पळुन गेले होते. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठांनी दिलेल्या सुचनाप्रमाणे गुन्ह्यातील अनोळखी दोन इसमांचा शोध घेत असताना प्रतापसिंहनगर खेड, ता. जि. सातारा येथून एक संशयीत इसमास ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केला असता त्याने साथीदाराच्या मदतीने गुन्हा केल्याचे सांगून चोरी केलेली ड्रील मशीन व गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल असा एकुण 33, हजार 500 रुपयांचा मुद्देमाल काढून दिला. तो गुन्ह्याचे कामी जप्त करण्यात आला आहे.

दरम्यान, दि.15 रोजी एम.आय.डी.सी परिसरात घडलेल्या गुन्ह्याशी संबंधित एक महिला सातारा शहरातील प्रतापसिंहनगर ते संगमनगर कॅनॉल जवळ थांबून एक महिला संशयास्पदरित्या साहित्य घेवून जात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याठिकाणी जावून तिच्याकडे चौकशी केली असता महिलेने तिने साथीदार महिलाचे सोबतीने जयहिंद फर्निचर एमआयडीसी सातारा येथील फर्निचरचे दुकान फोडून दुकानातील साहित्य चोरी केल्याचे सांगितले. या महिलेकडून 30 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

तसेच दि. 13 रोजी सातारा शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक हे सातारा परीसरात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, लक्ष्मीटेकडी सदरबझार सातारा परिसरात घरफोडी करणारा संशयीत इसम आला आहे. त्यावेळी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी यांनी लक्ष्मीटेकडी सदरबझार सातारा परिसरात आरोपीचा शोध घेवून त्यास ताब्यात घेतले. त्यची कसुन चौकशी केली असता त्याने लक्ष्मीटेकडी झोपडपट्टी येथील पत्र्याचे घर फोडून चोरी केल्याचे निष्पन्न झाले. आरोपीकडुन 6 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

ही कार्यवाही पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलीस अधीक्षक सातारा आँचल दलाल, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम, पोलीस उपनिरीक्षक व्ही.आर. कडव, पोहवा. गुलाब जाधव, पोलीस नाईक अविनाश चव्हाण, जोतीराम पवार, शिवाजी भिसे, संदिप आवळे, अमृत वाघ, पो. कॉ. गणेश घाडगे, अभय साबळे, संतोष कचरे, गणेश भोंग व विशाल धुमाळ यांनी केली.


Back to top button
Don`t copy text!