स्थैर्य, सातारा, दि.१७: येथील राधिका रोड परिसरात लोकांना मारहाण करून लुटणार्या तिघाजणांना सातारा शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने जेरबंद केले आहे. अक्षय सूर्यकांत पवार वय 22 रा. मस्करवाडी, ता. सातारा, दीपक भरत चव्हाण वय 26 रा. लावंघर, ता. सातारा आणि दत्तात्रय आबा शिंदे वय 29 रा. शिंदेवाडी, ता. सातारा अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून 1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी, राधिकारोड परिसरात दि. 15 रोजी अज्ञात चोरट्यांनी दोन इसमांचे मोबाईल, गळ्यातील चेन व पैसे जबरदस्तीने काढून घेवून जबरी चोरी केली होती. त्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाणे व शाहुपुरी पोलीस ठाणे येथे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले होते. त्याचा तपास सुरू होता.
यापैकी रामनंद शिवनाथ साह रा. करंजे पेठ सातारा यांनी दिलेल्या तक्रारीवरून सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने नमूद वर्णनावरून आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. याप्रकरणी पोलिसांनी दि. 17 रोजी दोन संशयितांना ताब्यात घेतले तर एकास वाढे फाटा सातारा येथून ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी दि. 15 रोजी सायंकाळी दोन अज्ञात इसमांचे मोबाईल व रोख रक्कम जबरदस्तीने मारहाण करुन काढून घेतल्याचे मान्य केले. त्यांच्याकडून एक मोबाईल फोन, चेन व गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकल असा एकुण 1 लाख 10 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलीस अधीक्षक, उपविभाग श्रीमती आँचल दलाल मॅडम, सहायक पोलीस निरीक्षक बाजीराव ढेकळे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहर पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोउनि. नानासाहेब कदम, पोउनि अनिल पाटील, पोउनि श्रीमती भगत, पोहवा प्रशांत शेवाळे, पोना अविनाश चव्हाण, पोना. शिवाजी भिसे, ज्योतीराम पवार, पोशि गणेश भोंग, अभय साबळे, गणेश घाडगे, संतोष कचरे, विशाल धुमाळ, किशोर तारळकर यांनी गुन्हा घडल्यानंतर तत्काळ आरोपींचा जेरबंद करून गुन्ह्याचा छडा लावला आहे.