वाढे फाटा येथे ट्रकचालकाच्या डोक्यात दगड घालून रक्कम लुटणार्‍या दोघांना अटक सातारा शहर पोलिसांची कामगिरी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. २७ : वाढे फाटा, सातारा येथे महामार्गावर ट्रकचालकाला जबर दुखापत करून 20 हजारांची रोख रक्कम लुटणार्‍या तिघाजणांना काही तासांतच सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले. तिघांपैकी सुरज राजू माने वय 22 वर्षे राहणार लक्ष्मी टेकडी सदर बाजार सातारा आणि तेजस संतोष शिवपालक वय 21 वर्षे राहणार लक्ष्मी टेकडी सदर बाजार सातारा यांना पोलिसांनी अटक केली आहे तर एक विधीसंघर्षग्रस्त बालक आहे.

याबाबत माहिती अशी, दि. 25 रोजी रात्री 1.30 वाजता राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वाढे फाटा, सातारा येथे उड्डाणपुलावर फिर्यादीचा ट्रक अचानक बंद पडला. यामुळे फिर्यादी व त्याचा मित्र ट्रकच्या केबिनमध्ये झोपले होते. रात्री 01.30 वाजता सुमारास अचानक तीन अनोळखी इसमांनी ट्रकचे दोन्ही दरवाजे उघडून ट्रकमध्ये प्रवेश केला व फिर्यादी, क्लिनर यांना दमदाटी करुन पैशाची मागणी करू लागले. फिर्यादी यांनी प्रतिकार केला असता त्यातील एकाने फिर्यादी यांचे डोक्यात दगड घातला व जबर दुखापत करुन त्यांचे ट्रकमधील 20000 रुपये रोख रक्कम जबरी चोरी करुन चोरुन मोटर सायकलवरून पळून गेले.
याबाबत फिर्यादी यांनी दिले तक्रारीवरुन सातारा शहर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीमधील आरोपींच्या वर्णनावरुन तसेच घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीच्या आधारे व खबर्‍यांकडून प्राप्त माहितीच्या आधारे सातारा शहर पोलिसांनी तीन संशयीत इसमांना सातारा शहर परिसरातून ताब्यात घेतले. सुरवातीस त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु, त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. आरोपींतास गुन्ह्याचे तपासकामी अटक करण्यात आली आहे. ताब्यात घेतलेल्या तीन संशयीतांपैकी दोन आरोपी असून एक विधीसंघर्षग्रस्त बालक आहे. हा गुन्हा घडल्यापासून काही तासातच सातारा शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने संशयीत आरोपींना ताब्यात घेवून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एन. एस. कदम हे करीत आहेत.

पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलीस अधीक्षक सातारा श्रीमती आँचल दलाल, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम, पो. ना. अविनाश चव्हाण, शिवाजी भिसे, जोतीराम पवार, पो. कॉ. गणेश घाडगे, अभय साबळे, संतोष कचरे, गणेश भोंग व विशाल धुमाळ यांनी सहभाग घेतला आहे.


Back to top button
Don`t copy text!