साताऱ्यात पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट; पालिका पदाधिकारी व अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष


सातारा शहरासह उपनगरांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, मुबलक पाणीसाठा असतानाही पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

स्थैर्य, सातारा, दि. १ एप्रिल : मार्च महिन्यापासूनच उन्हाच्या झळा तीव्र झाल्या असताना सातारा शहरासह उपनगरांमध्ये पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला असून, काही भागांत अत्यंत कमी दाबाने पाणी येत असल्याने नागरिकांचा पारा चढला आहे. या गंभीर समस्येकडे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि पाणीपुरवठा अधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा संतप्त आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

मुबलक पाणीसाठा, तरीही भोंगळ कारभार

सातारा शहराला चोहोबाजूने मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. निसर्गाने भरभरून दिले असतानाही केवळ पाणीपुरवठा विभागाच्या भोंगळ आणि नियोजनशून्य कारभारामुळे शहरासह उपनगरातील पाणीपुरवठ्याचा बोजवारा उडाला आहे. पालिकेने लवकरात लवकर हा पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी जोरदार मागणी आता जोर धरू लागली आहे.

पाहणीचे दौरे आणि आश्वासने हवेतच

निवडून आल्यानंतर लगेचच नगराध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी चार-चार वेळा कास धरण आणि पाणीपुरवठा करणाऱ्या विभागाची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली होती. ‘महिनाभरातच पाणीपुरवठा सुरळीत होईल’, असे मोठे आश्वासन त्यांनी दिले होते. मात्र, हे आश्वासन हवेतच विरले असून सातारकरांना अद्यापही हक्काचे पाणी मिळत नसल्याने त्यांच्यात प्रचंड नाराजी पसरली आहे.

पदाधिकाऱ्यांवर रोष आणि आंदोलनाचा इशारा

प्रभागातील नगरसेवक निवडणुकीत दिलेली आश्वासने पाळत नसल्याने त्यांच्यावरही नागरिकांचा प्रचंड रोष वाढला आहे. पाणीपुरवठा विभागाचे कामकाज उपनगराध्यक्षांकडे असताना, शहरात पाण्याचा असा ठणठणाट सुरू असताना ते नेमके काय करतात, असा संतप्त सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

मार्च आणि एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच पाण्यासाठी नागरिकांना असा संघर्ष करावा लागत असेल, तर पुढील दोन महिन्यांच्या कडक उन्हाळ्यात काय अवस्था होईल? पाणीपुरवठा विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा संतप्त सातारकरांनी दिला आहे.


Back to top button
Don`t copy text!