दैनिक स्थैर्य । दि.१६ नोव्हेंबर २०२१ । सातारा । महाड, रायगड येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय सबज्युनियर मुले व मुलींच्या बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सातारा संघाचे प्रतिनिधित्व करताना सातारा बॉक्सिंग अकॅडमीच्या खेळाडूंनी ४ सुवर्ण पदक, १ रौप्यपदक आणि १ कांस्य पदक अशा एकूण ६ पदकांची कमाई केली. या स्पर्धेत सातारा जिल्हा संघाला सांघिक विजेतेपद ट्रॉफी मिळवून देत अकॅडमीने विजयाचा झेंडा रोवला.
स्पर्धेत समीक्षा होले (४८-५० किलो), श्रवण माने (४३-४६), श्रीराज शिंदे (६७-७०) आणि सैफअली झारी (७० किलोच्या पुढे) यांनी सुवर्ण पदक पटकावले. श्रावणी भोसले (५४-५७) हिने रौप्य तर प्रांजल काजळे (५२-५४) हिने कांस्य पदक मिळवले. सुवर्ण पदक विजेत्या ४ खेळाडूंची राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली. सर्वांना आंतरराष्ट्रीय मानद प्रशिक्षक सागर जगताप, विनोद राठोड आणि मधुर भोसले यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंचा जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
यशस्वी खेळाडूंचे जिल्हा बॉक्सिंग संघटनांचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, विभागीय सचिव योगेश मुंदडा सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले. यावेळी अकॅडमीचे अध्यक्ष हरीश शेट्टी, रवींद्र होले, अमर मोकाशी, संजय पवार, तेजस यादव, शैलेंद्र भोईटे, ओमकार गाढवे, यशश्री धनावडे, बापूसाहेब पोतेकर, सतीश शिंदे , तुषार शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.