
स्थैर्य, सातारा, दि. 18 डिसेंबर : येथील रा.ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्टच्या वतीने दिला जाणारा 2025 सालचा 35 वा सातारा भूषण पुरस्कार कराड तालुक्यातील मसूर येथील ज्येष्ठ संशोधक डॉ.ज्येष्ठराज जोशी यांना येत्या 28 डिसेंबर 2025 रोजी रविवारी सकाळी 11 वाजता सन्मानपूर्वक प्रदान केला जाणार आहे .रा. ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्ट, सातारा व सातारकर नागरिकांतर्फे दरवर्षी ज्ञान, विज्ञान, साहित्य, कला, क्रीडा अशा कोणत्याही क्षेत्रात उत्तुंग कार्य करणार्या आणि सातारा जिल्ह्याचा नावलौकिक वाढविणार्या सातारा जिल्ह्याच्या सुपुत्राला / संस्थेला सातारा भूषण पुरस्काराने गौरविले जाते.यावर्षीचा हा पुरस्कार पद्मभूषण जेष्ठराज भालचंद्र जोशी यांना प्रदान केला जाणार आहे .
सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील इंजीनियरिंग कॉलेजच्या सभागृहात सकाळी 11 वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून हा पुरस्कार सातारा येथील जेष्ठ शास्त्रज्ञ, विचारवंत, संशोधक, लेखक डॉ.दत्तप्रसाद दाभोलकर यांच्या हस्ते व रयत शिक्षण संस्थेचे संघटक डॉ .अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वितरित केला जाणार आहे. याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा चे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के, व कराड येथील विठामाता विद्यालय च्या माजी मुख्याध्यापिका सौ. प्रतिभाताई ताम्हणकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे ,अशी माहिती गोडबोले ट्रस्टचे विश्वस्त डॉ. अच्युत गोडबोले यांनी दिली आहे.
डॉ.ज्येष्ठराज जोशी यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील मसूर येथे झाला असून त्यांचे शालेय शिक्षण कराड येथे पूर्ण झालेले आहे डॉ. जेष्ठराज जोशी यांनी डॉक्टर होमी भाभा इन्स्टिट्यूट ,मुंबई तसेच परदेशातील अनेक विद्यापीठात प्रोफेसर म्हणून काम केले आहे. 54 वर्षे संशोधन व अध्यापनाचे काम करणारे श्री .जोशी यांना सन 2014 साली पद्मभूषण पुरस्काराने भारत सरकारने गौरविलेले असून त्यांना याबरोबरच भटनागर पुरस्कार, उत्तम शिक्षक पुरस्कार आदी मान्यवर पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे त्यांची 1000 हून अधिक संशोधनावरील विशेष पब्लिकेशन ही प्रकाशित करण्यात आली असून नवीन प्रकारच्या केमिकल व औद्योगिक इंजीनियरिंग मधील संशोधनासाठी त्यांनी केलेले संशोधन व अध्यापनाचे काम खरोखरच गौरवपूर्ण असे आहे जोशी यांनी मराठी विज्ञान परिषदेसाठी विशेष योगदान दिले असून ग्रामीण पाणीपुरवठा योजनेसाठी ही त्यांनी केलेले कार्य हे गौरवपूर्ण असे आहे
अनेक नामवंत अकॅडमीचे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले असून 200 हून अधिक विद्यार्थी त्यांच्या शोधनिबंधांवर अभ्यास करून त्यांनीही पीएचडी ही पदवी प्राप्त केलेली आहे .आणि अनेक नवनवीन शोध श्री. जोशी यांनी लावले असून विविध प्रकारची अतिशय सुरेख अशी डिझाईन्स श्री .जोशी यांनी आत्तापर्यंत तयार केलेली आहेत. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून सातारा जिल्ह्यातील मूळ असलेल्या श्री .जोशी यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.रासायनिक, अभियांत्रिकी आणि अणुविज्ञान क्षेत्रातील आपल्या उल्लेखनीय कार्याचा सन्मान म्हणून सन 2025 च्या सातारा भूषण पुरस्कारासाठी पद्मभूषण जेष्ठराज भालचंद्र जोशी यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी अनेक मान्यवरांना सदर पुरस्काराने सन्मानित केले आहे. सदर परंपरा गेली 34 वर्षे अखंडपणे चालू आहे. सन 1991 पासून ट्रस्टने सातारा भूषण पुरस्कार देण्याचा उपक्रम सुरू केला. त्यामार्फत दरवर्षी ज्ञान, विज्ञान, साहित्य, कला, क्रीडा अशा कोणत्याही क्षेत्रात उत्तुंग कार्य करणार्या सातारा जिल्ह्याच्या सुपुत्राला सातारा भूषण पुरस्काराने गौरवले जाते. रोख रु. 40 हजार व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

