सातारची ‘लालपरी’ जाऊन आली बंगालच्या ‘सागरी’

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


परप्रांतीयांना सोडून सुखरूप आली माघारी; चालकांचा आ. शिवेंद्रसिंहराजेंनी केला सत्कार 

स्थैर्य, सातारा, दि. 24 : कोरोना महामारीमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालेले असताना परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात पोहोचवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. साताऱ्यातील  22 मजुरांना पश्चिम बंगालमधील नुधीया या जिल्ह्यात पोहचवण्याची जबाबदारी सातारा आगाराने उचलली. या मजुरांना नुधिया येथे सुखरूप पोहचवून, अनंत अडचणी आणि जीवघेण्या अन्फाम वादळाशी दोन हात करून  एमएच 13 ई ओ 8471 ही साताऱ्यातील ‘लालपरी’ बंगालच्या ‘सागराला” वेढा मारून परतली. लालपरीच्या या विक्रमी प्रवासाबद्दल सुरेश जगताप आणि संतोष निंबाळकर या दोन्ही चालकांचे सर्वत्र कौतुक होत असून या कामगिरीबद्दल दोघांचाही आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सन्मान केला.

सातारा शहरात लॉकडाऊनमुळे बाहेरच्या राज्यातील मजूर अडकले होते. त्या मजुरांना त्यांच्या गावी पोचवण्यासाठी राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशानुसार राज्य परिवहन महामंडळाच्याकडून आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार 22 जणांनी पश्चिम बंगालमध्ये असलेल्या नुधीया या जिल्ह्यात सोडण्याची विनंती केली होती. मजुरांच्या मागणीनुसार त्यांना त्यांच्या गावी पोहचवण्याची जबाबदारी सातारा आगाराने घेतली होती. सातारा आगाराने दिलेली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आगारचे अधिकारी संजय भोसले, रेश्मा गाडेकर यांनी  एमएच 13 ई ओ 8471 बस आणि अनुभवी चालक एस. टी. जगताप व नवखे चालक एस. एस. निंबाळकर यांच्याकडून निवड झाली. सलग ५० तास २३०० किमी प्रवास करत त्या 22 मजुरांना पश्चिम बंगालमधील नुधीया या जिल्ह्यात सुखरूप पोहचवण्यात आले. हा जिल्हा बांग्लादेशला जोडून आहे. साताऱ्याकडे परत फिरताना बस आणि  दोन्ही चालक अन्फाम वादळात आठ तास खडकपूर येथे अडकले. त्यातूनही सुखरूप बाहेर पडून खूप लांबच्या प्रवासाची आठवण घेऊन ते दोन्ही चालक मजल दरमजल करत दि.20 रोजी सातारच्या मायभूमीत पोहचले.

दोनशे किलोमीटर अंतर एकाने तर पुढील दोनशे किलोमीटर अंतर दुसऱ्याने  (एका दिवसात 900 किलोमीटर अंतर) अशी गाडी चालवत तब्बल ४ हजार ६०० किमी अंतर पाच दिवसात कापण्याचा विक्रम लालपरीने या दोन्ही चालकांच्या साहाय्याने केला आहे. पेट्रोल पंपावर डिझेल टाकण्यासाठी आणि थोडावेळ चेक पोस्टवर तपासण्या करण्यासाठी थांबले जात होते. तेथेच जेवण खाणे केले जात होते. तब्बल चार राज्यांच्या सीमा ओलांडून पश्चिम बंगाल येथील नुधीया या जिल्ह्यात दि17 रोजी रात्री 12.30 ला गाडी पोहचली. त्या 22 जणांचे मेडिकल तपासणी केल्यानंतर दि.18 रोजी सकाळी 12 वाजता परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली. वाटेत त्यांना ओडिशा राज्यात अनफाम या वादळात सुरक्षिततेच्या कारणास्तव थांबावे लागले. दि. 20 रोजी हि लालपरी सुखरूप सातारा आगारात परतली.

सातारा आगारातील लालपरीने एवढ्या लांबचा पल्ला गाठण्याची ही एस. ती. महामंडळाच्या इतिहासातील पहिलीच वेळ असून हा विक्रम करणारे चालक जगताप आणि निबाळकर यांची कामगिरी उल्लेखनीय आहे, अशा शब्दात आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी दोघांचे कौतुक केले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!