
दैनिक स्थैर्य । दि. २५ एप्रिल २०२२ । सातारा । सातारा जिल्ह्याचे सुपुत्र तथा जिल्हा कोषागार अधिकारी धनाजीराव शिंदे यांची उपसंचालक पदी पदोन्नती झाली असून त्यांची मुंबई येथे उद्योग, ऊर्जा व कामगार विभागात प्रतिनियुक्तीवर पदस्थापना झाली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 2010 साली निवड झाल्यानंतर ते सहायक संचालक, विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे 2011 ते 2014 कार्यरत होते व त्यानंतर सहायक संचालक, स्थानिक लेखापरीक्षण कोल्हापूर येथे 2014 ते 2018 पर्यंत कार्यरत असताना गुणवत्तापूर्ण लेखापरीक्षण बाबत विशेष भर दिला होता. उत्कृष्ट संघटन कौशल्य, नेतृत्वगुण, शिस्तप्रिय असणारे शिंदे यांची मे 2018 मध्ये जिल्हा कोषागार अधिकारी सातारा येथे नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील निवृत्तीवेतन धारकांना तात्काळ अचूक व जलद सेवा देण्याच्या दृष्टीने निवृत्तीवेतन सुविधा केंद्राची स्थापना कोषागारात केली तसेच उपकोषागारे व कोषागार आधुनिकीकरण करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती व वित्त विभागाच्या निधीतून कार्यालयात सुधारणा करण्यात आल्याने देशपातळीवर मानांकनाने सातारच्या कार्यालयास गौरविण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनस्तरावर राबविले गेलेल्या संगणकीय केंद्रीय कोषागार प्रणाली, SBI फास्ट प्रणाली, रिअल टाइम व्हाउचर प्रणाली यशस्वीपणे कार्यालयात राबवून शासनाच्या शून्य प्रलंबितता धोरण राबविण्यासाठी व अचूक, जलद व पारदर्शी सेवा पुरवण्यासाठी “शीघ्र प्रतिसाद कोषागारे” नाविन्यपूर्ण योजना राबवून कोषागाराचे संपूर्ण कार्यालयीन कामकाज संगणकीय करण्यात पुढाकार घेतला आहे.
श्री. शिंदे यांच्या पदोन्नतीबाबत राज्य संचालक वैभव राजेघाटगे व जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी अभिनंदन करून केलेल्या अत्युत्कृष्ट कार्यालयीन कामकाजासाठी व पुढील प्रशासकीय वाटचालीस धनाजीराव शिंदे यांना शुभेच्छा दिल्या.