
दैनिक स्थैर्य । 8 जून 2025। फलटण । सासवड झणझणे आळी (नरसिंग वॉर्ड) (ता. फलटण) या भागात वर्षभर ग्रामस्थांना दूषित पाणीपुरवठा केला जात आहे. ग्रामविकास अधिकारी उद्धव सुपेकर यांना त्याबाबत वारंवार माहिती देऊनही याकडे डोळेझाक केली जात आहे.
सासवड झणझणे येथील झणझणे आळी (नरसिंग वॉर्ड) या भागात गेले वर्ष झाले दूषित पाणी येत आहे. सांडपाणी वाहणार्या गटारातून पाण्याच्या पाइप गेल्या आहेत. त्यापैकी एखादी पाइप तुटल्याने त्यातून गटाराचे दूषित पाणी मिसळल्याने या भागात दुर्गंधीयुक्त दूषित पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे साथीचे आजार वाढत आहेत. या भागात महिला, लहान मुले साथीच्या आजाराने त्रस्त आहेत.
ग्रामस्थांनी भेटून समक्ष पाणी पुरवठा दूषित झाल्याचे निदर्शनास आणले. मात्र त्यात सुधारणा झाली नाही.
त्याबाबत कोणतीही खबरदारी न घेता ग्रामपंचायत प्रशासक तथा ग्रामविकास अधिकारी सुस्त असल्याने या भागातील ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यातून आंदोलन होण्याची शक्यता व्यक्त होत आहे, तरी वरिष्ठ अधिकार्यांनी या प्रश्नात लक्ष घालून ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. सासवड ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य यांची मुदत संपल्याने ग्रामपंचायत बरखास्त झाली आहे. त्यामुळे ग्रामविकास अधिकारी सुपेकर हेच काम पाहतात. गत वर्षभरात याबाबत त्यांच्याकडे लेखी तकारी केल्या आहेत
झणझणे ग्रामपंचायत व प्रशासकांच्या वेळकाढूपणा व दुर्लक्ष झणझणे आळी वर्षभर दूषित पाणी आहे. शासनाने सासवड गावात पाणीपुरवठा योजनेवर लाखो रुपये खर्च करूनही दूषित पाणी प्यावे लागत असल्याने जिल्हा प्रशासनाने लक्ष घालावे.
– संजीव झणझणे, सासवड, ता. फलटणझणझणे आळी येथील पाणीपुरवठा जलवाहिनी दहा वर्षे जुनी आहे. ती सिमेंट काँक्रीट रस्त्याखालून गेली आहे. ग्रामस्थांनी मोटारी लावण्यासाठी खड्डे खोदले. त्यावेळी जलवाहिनी फुटून पाणी दूषित होत असावे. तोपर्यंत ग्रामस्थांनी पाणी उकळून व गाळून प्यावे. प्रशासनाला सहकार्य करावे.
– उद्धव सुपेकर, प्रशासक तथा ग्रामविकास अधिकारी

