स्थैर्य, सासकल दि.०४ : मौजे सासकल (ता.फलटण) येथील रस्त्याचा प्रश्न हा कायमच ऐरणीवर राहिला आहे. पावसाळ्यापूर्वी या रस्त्याची डागडुजी करणे किंवा कायमस्वरूपी डांबरीकरण करणे आवश्यक होते. मात्र तसे न होता नुकत्याच झालेल्या पावसाने या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून ग्रामस्थांना याचा त्रास भोगावा लागत आहे.
अनेक वर्षे या रस्त्यासाठी सुरु असलेल्या कायदेशीर लढाईनंतर अॅडव्होकेट रामचंद्र घोरपडे यांनी विनामोबदला हा लढा लढून सासकल गावासाठी सदर रस्ता खुला करुन घेतला. या कमी पद्मश्री लक्ष्मण माने यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हा रस्ता खुल्या करण्यासाठी आंदोलन करण्यात आले होते. रस्ता ग्रामस्थांसाठी खुला झाल्यानंतर विधानपरिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व आमदार दीपक चव्हाण यांच्या उपस्थितीत या रस्त्याचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले होते. या रस्त्याला विरोध करणार्या भाडळी बुद्रुक गावच्या ग्रामस्थांनी व शेतकर्यांनी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या सांगण्यावरून अतिशय सामंजस्याची भूमिका घेऊन सासकल ग्रामस्थांना व प्रशासनाला सहकार्य केले आहे. मात्र अजूनही सासकल ग्रामस्थ या रस्त्याच्या प्रतिक्षेतच आहेत.
या रस्त्यावरील एक किलोमीटरचे डांबरीकरण सोडले तर इतर खडीकरण झालेल्या व मुरमीकरण झालेल्या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी पाणी साचून चिखल होऊन अपघात होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असणार्या पावसामुळे अनेक लोकांचे अपघात होऊन लोक घसरून पडले आहेत. प्रशासनाने कायमस्वरुपी डांबरीकरण करून हा रस्ता वाहतुकीसाठी रहदारीसाठी पूर्ववत करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे.
‘‘मौजे सासकल गावठाणास येण्यासाठी गावच्या चारी बाजूनी ओढेच आहेत. त्यामुळे लोकांना येण्या-जाण्यासाठी वाहतुकीसाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या ओढ्यावरील दोन साकव वाहून गेल्यामुळे सदर रस्ता तातडीने होण्याची गरज आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी व प्रशासनाने तातडीने यावर कारवाई करावी व रस्ता पूर्ववत करावा. गतवर्षी जनआंदोलन समितीच्या वतीने श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी मुरुमीकरण करून दिले होते. परंतु हा रस्ता डांबरीकरण करून पक्का करण्याची गरज आहे. हे काम न झाल्यास सासकल जनआंदोलन समितीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.’’
– शिवाजी हरिबा मुळीक, अध्यक्ष सासकल जनआंदोलन समिती.
‘‘महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर याच्या आदेशाप्रमाणे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपकराव चव्हाण यांनी याच रस्त्यावर एक कि.मी चे डांबरीकरण यापूर्वी केले आहे.त सेच श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी धुमाळवाडी होऊन सासकलमार्गे पुढे जाणार्या ओढ्यावर बांधण्यात आलेले साकव पूल वाहून गेल्याने गतवर्षी याच रस्त्यावर संपूर्ण मुरुमीकरण करून रोलिंग करून रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत केला होता. त्यांच्याच आदेशाने कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सातारा यांच्यावतीने निविदा काढण्यात आली असून हा रस्ता सासकल – भाडळी बुद्रुक – सोनवाडी बुद्रुक विडणी सांगवी रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग 88 भाग सासकल – भाडळी बुद्रुक – सोनवाडी बुद्रुक विडणी सांगवी रस्ता सुधारणा करणे ता.फलटण जि.सातारा कामाची अंदाजित किंमत रू. लक्ष 161.60 अशी निविदा निघाली असून हे काम दहा महिन्यांत पूर्ण करायचे आहे.त्यामुळे ग्रामस्थांचा रस्त्याचा प्रश्न लवकरच मिटणार आहे. याबद्दल ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे मन:पूर्वक धन्यवाद !‘‘
सौ.उज्ज्वला किरण घोरपडे, माजी सरपंच, सासकल.