
फलटण कृषी महाविद्यालयाच्या वतीने सासकल येथे राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा. अवाकॅडो उत्पादक बबन मुळीक यांचे मार्गदर्शन. विद्यार्थी व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग.
स्थैर्य, फलटण, दि. 23 डिसेंबर : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न फलटण कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांनी सासकल (ता. फलटण) येथे ‘राष्ट्रीय शेतकरी दिन’ मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी प्रगतशील शेतकरी आणि अवाकॅडो उत्पादक बबन मुळीक यांनी उपस्थितांना आधुनिक शेतीबाबत आणि पिकांच्या विविधतेबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.
“ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२५-२६” अंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत शेतकरी दिनाचे महत्त्व आणि भारतीय अर्थव्यवस्थेत शेतकऱ्याचे स्थान यावर चर्चा केली. यावेळी मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार वृक्षरोप देऊन पर्यावरणपूरक पद्धतीने करण्यात आला.
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले अवाकॅडो उत्पादक बबन मुळीक यांनी आपल्या प्रयोगांची माहिती दिली. पारंपारिक शेतीला आधुनिकतेची जोड दिल्यास शेती फायदेशीर ठरू शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमात उपस्थित ग्रामस्थांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि त्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.
सदर कार्यक्रम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कार्यक्रम समन्वयक प्रा. एन. एस. धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एम. साळुंखे आणि प्रा. एन. ए. पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषीदूत स्वरूप चव्हाण, तेजस शिंदे, श्रेयश शिंगाडे, गौरव भोसले, प्रसाद मुळीक, श्रीराज मांजरकर, सुमित शेवाळे आणि आदित्य पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.

