
दैनिक स्थैर्य | दि. 14 फेब्रुवारी 2025 | फलटण | फलटण तालुक्यातील सासकल येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने एक महत्वाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. वाघजाई मंदिर, सासकल येथे ऊस खोडवा पाचट व्यवस्थापन व सुपर केन नर्सरी या विषयावर शेतकर्यांना मार्गदर्शन देण्यात आले. या कार्यक्रमात मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगावचे डॉ. राजेंद्र भिलारे व अन्य प्रमुख अधिकारी सहभागी होते.
यावेळी गोरख मुळीक यांच्या शेतावर ऊस खोडवा पाचट व्यवस्थापन आयोजन केले होते. डॉ. राजेंद्र भिलारे यांनी ऊसाची पाचट न जाळता खोडवा नियोजन करून ऊस तुटून घेल्यावर उसाचे वर तोडलेले बुडके कोयत्याने छाटून त्यावरती बुरशीनाशक व कीटकनाशक फवारणी करण्याबाबत मार्गदर्शन केले. पाचट कुजण्यासाठी 10 किलो जिवाणू चा वापर एकरी 50 किलो नत्र, स्फुरद 50 किलो खत मात्रा द्यावी असे सांगितले.
ऊस बेणे विक्री अधिकारी डॉ. दत्तात्रय थोरवे यांनी उसाच्या विविध नवीन विकसित जाती जसे की फुले ऊस 15012, फुले ऊस 13007, आणि फुले ऊस 15006 या जातींबद्दल माहिती दिली. विद्यापीठाने शिफारस केलेल्या फुले सुपरकेन नर्सरी ऊस रोपे निर्मिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कमी खर्चामध्ये ऊस रोपे तयार करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड यांनी माहिती दिली की फलटण तालुक्यात एकूण 680 फुले सुपर केन नर्सरी द्वारे ऊसाची लागवड केली असून, सासकल गावातील 18 शेतकऱ्यानी सुपर केन नर्सरी द्वारे ऊसाची लागवड केली आहे. तालुक्यात 60 टक्के क्षेत्रावरती ऊस खोडवा पाचट व्यवस्थापन केले आहे.
मच्छिन्द्र मुळीक यांनी कृषि विभागाच्या मार्गदर्शन खाली फुले सुपर केन नर्सरी द्वारे रोपे तयार करून 7 फूट पट्टा पद्धतीने लागवड केलेल्या ऊस प्लॉट उत्कृष्ट नियोजन असल्याचे सांगितले. एकरी 100 टना पर्यंत लक्ष शक्य होणार असल्याचे डॉ. राजेंद्र भिलारे यांनी सांगितले.
या कार्यक्रमामुळे शेतकर्यांना आधुनिक तंत्रज्ञान व मार्गदर्शन मिळून त्यांचे उत्पादन वाढेल आणि आर्थिक स्थिती सुधारेल. कृषी विभागाच्या अशा प्रयत्नांमुळे शेती क्षेत्रात नवीन दिशा मिळेल आणि शेतकर्यांचे जीवन सुखकर होईल.