दैनिक स्थैर्य । दि.०७ फेब्रुवारी २०२२ । बिदाल । माझ्या विरोधात काही लोकांनी जाणीवपूर्वक षड्यंत्र रचून माझी सही मराठीमध्ये व सोपी असल्यामुळे गैरफायदा घेऊन काही लोकांनी स्वतः खोटी सही केल्या आहेत. मला ग्रामपंचायतीने कोणतीही नोटीस न पाठवता. माझी जाणीवपूर्वक बदनामी करत आहे. तरी यासंदर्भात सदर ग्रामसेवक सचिन खाडे व पंचायत समितीचे सभापती सौ. अपर्णा भोसले यांची चौकशी व्हावी ही मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुरूपखानवाडीच्या सरपंच सौ. सुरेखा श्रीमंत जाधव यांनी पत्राद्वारे केली.
या पत्रात असे म्हटले आहे की, माझ्या बनावट सहीचा वापर करून गावातील काही राजकीय लोकांनी ग्रामसेवकांच्या मदतीने कागदपत्रांच्या साह्याने माण पंचायत समितीच्या सभापती अपर्णा भोसले यांच्याकडे कागदपत्रे सादर करून मी राजीनामा दिले आहे, अशी चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर मला ग्रामपंचायतीने 13 जानेवारी रोजी मासिक सभा आहे. असे पत्र दिले होते. मात्र पुन्हा ग्रामपंचायतीच्या शिपाईजवळ निरोप देण्यात आला की मासिक सभा रद्द करण्यात आली आहे. अशा चुकीच्या पद्धतीने मला विश्वासात न घेता काही राजकीय मतभेदांमुळे काही लोकांनी ग्रामसेवकाचा व सभापतींचा वापर करून माझ्यावर हे षड्यंत्र रचले आहे. तरी संबंधित प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करावी ही मागणी या पत्रात केली आहे.