
स्थैर्य, फलटण, दि. 20 नोव्हेंबर : भारत देश विविध धर्म, भाषा, विविध समाज, संस्कृती यांनी बनलेला आहे. अनेक देश वेगवेगळ्या कारणांमुळे विभागले आहेत, परंतु भारत देश आजही एकसंध आहे, याचे मूळ कारण भारतीय संविधान आणि महापुरुषांनी दिलेले योगदान हे आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांचे कार्य यामुळेच अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. ते तरुण पिढीने सदैव स्मरणात ठेवणे आवश्यक आहे, असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले.
सातारा शहरात माय भारत सातारा, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार व जिल्हा प्रशासन, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त ‘सरदार150 यूनिटी मार्च पदयात्रेचा शुभारंभ जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी गांधी मैदान, राजवाडा परिसर येथून हिरवा झेंडा दाखवून केला. जिल्हाधिकारी संतोष पाटील व पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी संपूर्ण पदयात्रेत सहभाग घेवून युवकांना सरदार वल्लभभाई पटेल यांचा एकतेचा संदेश घरोघरी पोहोचविण्यासाठी प्रोत्साहित केले.
या कार्यक्रमास कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरु ज्ञानेश्वर मस्के, कुलसचिव डॉ. विजय कुंभार, रयत शिक्षण संस्था सचिव प्रतिनिधी एन टी निकम, शिक्षणाधिकारी(माध्य.) धनंजय चोपडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सतेश हंगे, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, माय भारत केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी स्वप्नील देशमुख यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांना श्रद्धांजली अर्पण करताना स्वातंत्र्योत्तर काळातील त्यांच्या सर्व संस्थाने एकत्र आणून भारताच्या आजच्या विशाल, भव्य, जडणघडणीत दिलेल्या योगदानाचे महत्व अधोरेखित केले.
यावेळी, राष्ट्रीय सेवा योजना संचालक नंदकुमार माने, जिल्हा समन्वयक कोंडीबा शिंदे, जिल्हा , कार्यक्रम अधिकारी भानुदास यादव, महानगरपालिका क्रीडा अधिकारी सूर्यकांत शेटे उपस्थित होते. या उपक्रमात शहरातील सर्व शाळा, महाविद्यालये, स्थानिक युवा संघटना, माय भारत, एनएसएस, एनसीसी स्वयंसेवक आणि बीएसजी युनिट्स यांचा प्रमुख सहभाग होता.
सातारा जिल्ह्यात मेरा युवा भारत, कोल्हापूर (युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकार)च्या माध्यमातून 2025 हे वर्ष भारताचे लोहपुरुष आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रमुख शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांची 150 वी जयंती वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. या ऐतिहासिक प्रसंगाचे औचित्य साधून राष्ट्रीय एकता दिनानिमित्त 31 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर 2025 दरम्यान संपूर्ण भारतभर जिल्हास्तरीय यूनिटी मार्च पदयात्रा आयोजित केल्या जात आहेत.
ही यूनिटी मार्च पदयात्रा सकाळी 7.30 वाजता गांधी मैदान, राजवाडा येथून सुरू झाली त्यानंतर नगरपालिका सातारा समोरून पोवई नाका येथून छ. शिवाजी महाराज संग्रहालय परिसरात सहा. क्युरेटर शिंदे यांनी स्वागत करून समाप्त झाली. पदयात्रा सुरू होण्यापूर्वी अर्जुन लगस चौगुले यांच्या टीम द्वारे सरदार पटेल यांचा एकतेचा संदेश देणारा पोवाडा शाहीर संजय जाधव, अर्जुन लगस यांनी सादर केला. संपूर्ण कार्यक्रमाचे सफल संचलन राजेंद्र माने, यूनियन स्कूल सातारा यांनी केले.
