सरस्वती शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन आणि पांडुरंग पवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सत्कार; माजी प्राचार्यांना निरोप


स्थैर्य, कोळकी, दि. २१ सप्टेंबर : शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या सरस्वती शिक्षण संस्थेचा १८ वा वर्धापन दिन आणि संस्थेचे मार्गदर्शक पांडुरंग पवार यांचा वाढदिवस, प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे संयुक्तपणे उत्साहात साजरा करण्यात आला. या त्रिविध सोहळ्यानिमित्त विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला, तर संस्थेचे माजी प्राचार्य अमित सस्ते यांना निरोप देण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुधोजी हायस्कूलचे माजी प्राचार्य रवींद्र येवले होते. यावेळी व्यासपीठावर सरस्वती शिक्षण संस्थेचे मार्गदर्शक पांडुरंग पवार, सुलोचना पवार, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, संस्थेच्या संचालिका तथा लायन्स क्लब गोल्डन फलटणच्या अध्यक्षा संध्या गायकवाड, विकास गायकवाड, योग शिक्षक सुनील शिंदे, विद्या शिंदे, मयुरी किनगी, उज्ज्वला निंबाळकर, सुनीता कदम, माजी प्राचार्य अमित सस्ते आणि प्राचार्या सुजाता गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. पर्यवेक्षक महेंद्र कातुरे यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्थेच्या १८ वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला. यानंतर पांडुरंग पवार यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. नुकताच अमृतमहोत्सव साजरा केल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, संस्थेला केलेल्या मार्गदर्शनाबद्दल रवींद्र येवले आणि योगरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल सुनील शिंदे व विद्या शिंदे या दाम्पत्याचा विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी संस्थेच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षिका दीपा पाडळे, मेघा जाधव, अमृता निंबाळकर आणि प्रिया शेडगे यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. आपल्या मनोगतात संचालिका संध्या गायकवाड, योगशिक्षिका विद्या शिंदे, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता आणि अध्यक्षीय भाषणात रवींद्र येवले यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिणी जाधव व सुप्रिया बनसोडे यांनी केले, तर जयश्री घाडगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!