राष्ट्रवादीच्या कार्यालयातील सरस्वती पूजन हे उशीरा सुचलेले शहाणपण – चंद्रशेखर बावनकुळे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०५ ऑक्टोबर २०२२ । मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी सरस्वती देवीच्या अस्तित्वाबद्दल प्रश्न उपस्थित केला असल्याने त्या पक्षाच्या प्रदेश कार्यालयातील सरस्वती पूजन हे मनापासून झाले की, संपूर्ण राज्यातील हिंदू समाजाने टीका केल्यामुळे उशीरा सुचलेले शहाणपण आहे, असा सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

ते नागपूर येथे पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात आयोजित केलेल्या सरस्वती पूजनाविषयी एका पत्रकाराने प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी वरील सवाल केला.

ते म्हणाले की, मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी हिंदू देवदेवतांचा अपमान करण्याचे अनेक प्रकार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या बाबतीत घडले आहेत. त्यामध्ये छगन भुजबळ सामील झाले आहेत. त्यांनी अनेकदा ओवैसीसारखी भूमिका स्वीकारली आहे. ज्या सरस्वती मातेचे पूजन करून आपण सर्वांनी शिक्षणाचे धडे घेतले तिच्या अस्तित्वाबद्दल छगन भुजबळ यांनी प्रश्न उपस्थित केले. राज्यभरातील हिंदू समाजाने छगन भुजबळ व राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकेची झोड उठवली. त्यानंतर त्या पक्षाला सरस्वती पूजनाचे शहाणपण सुचले आहे. जनतेचा दबाव वाढला म्हणून ही पूजा केली की, मनात सरस्वतीला स्थान आहे, म्हणून राष्ट्रवादीने पूजा केली हे पहावे लागेल.

त्यांनी सांगितले की, राज्यातील सात कोटी रेशनकार्डधारकांना दिवाळीसाठी प्रत्येकी शंभर रुपयात रवा, डाळ, साखर व तेलाचे पॅकेज देण्याचा भाजपा – शिवसेना सरकारचा निर्णय महत्त्वाचा आहे. त्याबद्दल आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करतो. सरकार हा निर्णय चांगल्या रितीने अंमलात आणेल. तसेच तो लाभार्थींपर्यंत पोहचविण्यासाठी पक्ष संघटना काम करेल.


Back to top button
Don`t copy text!