
दैनिक स्थैर्य | दि. ०३ नोव्हेंबर २०२१ | सातारा | सातारा शहर परिसरातील अट्टल दुचाकी चोरटा आणि शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार विकी ऊर्फ विकास मुरलीधर मुळे यास तडीपार करण्यात आले होते. मात्र, सातारा शहरातून तडीपारीची कारवाई झालेली असतानाही तो तो ऐन दिवाळीत सातारा शहरातील बाजारपेठेत फिरताना आढळून आल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्याला शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, सातारा शहर आणि शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हदद्दीत असणाऱ्या गुंडांन तडीपार केल्यानंरही त्यांचा अजूनही साताऱ्यात वावर सुरु आहे. याची माहिती पुढे आल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशा तडीपार इसमांवर पाळत ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी, कर्मचारी अशा तडीपार गुंडांचा शोध घेत होते.
दरम्यान, शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेची टीम गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलींग करत असताना पोलीस अभिलेखावर असणारा हद्दपार आरोपी सराईत मोटार सायाकल चोरटा विकी ऊर्फ विकास मुरलीधर मुळे (रा. पॉवर हाऊस झोपडपट्टी, सातारा) हा बाजारपेठेत फिरत असताना दिसला. यावेळी त्याच्या नजरेस पोलीस आल्यामुळे तो पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. याचवेळी त्याला गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या टीमने ताब्यात घेतले आणि अटक केली.
या कारवाईत गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम, पोलीस हेड कॉन्स्टेबल हसन तडवी, पोलीस नाईक लैलेश फडतरे, अमित माने, स्वप्निल कुंभार, कॉन्स्टेबल मोहन पवार, पंकज मोहिते , ओंकार यादव आदी सहभागी झाले होते.