
स्थैर्य, सातारा, दि. 28 : सातारा येथील राधिका रस्त्यावर असलेल्या आपटे क्लिनिक समोर शस्त्राचा धाक दाखवून व मारहाण करुन मोबाईल चोरी करणाऱया साहील आयाज इनामदार, रा. केसरकर पेठ, सातारा व तेजस उर्फ भाऊ रमेश कदम रा. कोडोली, सातारा या सराईत चोरटयांना शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून गुन्हय़ात वापरलेली सिल्व्हर रंगाची बुलेट व दरोडयामध्ये चोरुन नेलला मोबाईल हॅन्डसेट असा एकूण 50 हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 21 मार्च दरोडय़ाचा गुन्हा नोंद असून यातील संशयित आरोपींनी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास राधिका रोड येथील आपटे क्लिनीक समोर शस्त्राचा धाक दाखवून तक्रारदारास मारहाण करुन त्यांचा 10 हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरुन नेला होता.
सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार साहील इनामदार व त्याचा साथीदार तेजस कदम यांनी केला असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांच्या शोधासाठी शाहुपूरी डी. बी. पथक मागावर होते. आरोपींचा शोध घेत असताना गुरुवारी हे दोघेजण मोटार सायकलवरुन भूविकास बँक चौकात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार आरोपींना पकडण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी सूचना दिल्या होत्या.
पथकाने भूविकास बँक चौक परिसरात सापळा रचुन या दोघांना चौकात आले असताना झडप घालून ताब्यात घेतले. त्यांनी गुन्हयाची कबुली दिलेली असून त्यांनी गुन्हयात वापरलेली सिल्व्हर रंगाची बुलेट व दरोडयामध्ये चोरुन नेलला मोबाईल हॅन्डसेट पोलिसांनी हस्तगत केला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक निरीक्षक विशाल वायकर, संदीप शितोळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल हसन तडवी, पोलीस नाईक लैलेश फडतरे, अमित माने, स्वप्निल कुंभार, पंकज मोहिते, ओंकार यादव, मोहन पवार यांनी केली आहे.