दैनिक स्थैर्य । दि.०६ फेब्रुवारी २०२२ । मुंबई । गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे भारतीय संगीताचे सप्तसूर हरपले आहेत, अशा शोकभावना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत.
भारतीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक चाहत्यांना संगीताचा आनंद देणाऱ्या लतादीदी संगीतातील एक युग होत्या. मराठी, हिंदी चित्रपट, भक्ती गीते आणि भावगीताला लतादीदींनी आपला अलौकिक ईश्वरी स्वर देऊन संगीत क्षेत्राला वेगळ्या उंचीवर नेले, असे श्री. जयंत पाटील यांनी आपल्या शोकसंदेशात नमूद केले आहे.
लतादीदींनी सुमारे सात दशकाच्या संगीत कारकीर्दीत पाच पिढ्यांचे आपल्या स्वरमधुर आवाजाने मनोरंजन केले. त्यांच्या आवाजाने भक्तिगीत, भावगीत, मराठी, हिंदी चित्रपट आणि अनेक भाषांतील संगीतात अतुलनीय योगदान दिले आहे. त्यांनी आपल्या मधुर आवाजाने अनेक भारतीय नागरिकांच्या भावविश्वाला संगीत समृद्ध केले आहे. त्यांच्या निधनाने भारतीय संगीत क्षेत्रातील एका युगाचा अंत झाला आहे, असे श्री जयंत पाटील यांनी नमूद केले आहे.