दैनिक स्थैर्य । दि.२० नोव्हेंबर २०२१ । सातारा । साक्षीदार झालेल्या ज्योती मांढरेने गुरुवारी सातारा जिल्हा न्यायालयात महत्वाची साक्ष दिली आहे. संतोष पोळनेच माझ्यासमोर तीन खून केल्याची साक्ष ज्योती मांढरेने दिली असून आपलं पोळ याच्यासोबत मंदिरात लग्न झाल्याचंही ज्योती मांढरेने सांगितलं आहे.
२०१६ साली तथाकथित डॉक्टर संतोष पोळने वाई (धोम) येथे केलेलं हत्याकांड उघडकीस आलं होतं. एकामागोमाग एक सहा खूनांचा उलगडा झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र आणि पोलीस यंत्रणा हादरली होती. या प्रकरणात संतोष पोळची साथीदार असलेली ज्योती मांढरे आता माफीची साक्षीदार बनली आहे.
२०१६ साली उघडकीस आलेल्या या हत्याकांडामुळे महाराष्ट्र हादरला होता
२०१६ साली उघडकीस आलेल्या या हत्याकांडामुळे महाराष्ट्र हादरला होता
या हत्याकांडाची सुनावणी जिल्हा सत्र न्यायालयात न्यायाधीश एन.एल.मोरे यांच्यासमोर सुरु आहे. विशेष सरकारी वकील उज्वल निकम सरकार पक्षातर्फे काम पाहत असून गुरुवारी ते न्यायालयात उपस्थित होते.वाई हत्याकांड प्रकरणात अनेक घडामोडीनंतर गुरुवारी या खटल्यातील महत्वाची माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिच्या साक्षीला सुरवात झाली. साक्ष देताना ज्योती म्हणाली, वाई येथील डॉ. घोटवडेकर यांच्या दवाखान्यात मी काम करत असताना २०१३ मध्ये तिची संतोष पोळ याच्याशी ओळख झाली.
१३ आक्टोबर २०१३ रोजी दोघांनी वाईतील गायत्री मंदीरात लग्न केले. त्यानंतर सहा महिन्यात काम सोडून नर्सिंग कोर्ससाठी प्रवेश घेतला. तीन वर्षांनी प्रशिक्षण पूर्ण झाले. लेखी परीक्षाही दिली. याचदरम्यान ज्योती संतोष पोळच्या संपर्कात आली. काही कालावधीनंतर ज्योती मांढरेला संतोष पोळ हा बनावट डॉक्टर असून त्याची डिग्री खोटी असल्याचं समजलं. ज्यानंतर संतोष पोळने ज्योतीला, “लोक मला डॉक्टर समजतात. मी तपासणीच्या बहाण्याने त्यांना बोलवतो आपण त्यांना मारून दागिने लुटू”, असं सांगितलं. ज्योती मांढरेने आपण पकडले जाऊ अशी भीती व्यक्त केल्यानंतर संतोष पोळने यापूर्वी मी सुरेखा चिकणे, वनिता गायकवाड व जगाबाई पोळ यांचा खून केला आहे असं सांगितलं.
ज्योतीने त्यांना तुम्ही हत्या कशा करता, मृतदेहाचे काय करता याबाबत विचारणा केली. त्यावेळी संतोष पोळने इंजेक्शन द्यायचे, त्यातून तो नैसर्गीक मृत्यू आल्यासारखे वाटते ज्यामुळे कोणालाही संशय येत नाही, असे सांगितले. अशाच पद्धतीने संतोष पोळने पुढे जाऊन नथमल, सलमा आणि मंगल जेधे यांचा खून केल्याची साक्ष ज्योती मांढरेने दिली आहे.