संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांची रथ व सायकल यात्रेचे फलटणमध्ये उत्साहात स्वागत


दैनिक स्थैर्य | दि. 26 डिसेंबर 2023 | फलटण | भागवत धर्माचे प्रचारक संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांची ७५३ वी जयंती, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर माऊलींचा ७२७ वा संजीवन समाधी सोहळा व शिख धर्माचे संस्थापक श्री गुरुनानकदेव यांच्या ५५४ व्या जयंतीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर (महाराष्ट्र) ते श्री क्षेत्र घुमान (पंजाब) अशा सुमारे २१०० किलोमीटरच्या रथ व सायकल यात्रेचे ऐतिहासीक फलटण नगरीत मोठ्या उत्साही व भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले. यात्रेचे हे दुसरे वर्ष होते.

यावेळी शिंपी समाजातील मान्यवर तथा जेष्ठ पत्रकार सुभाष भांबुरे, नूतन अध्यक्ष राजेश हेंद्रे, उपाध्यक्ष मृणाल पोरे, नामदेव समजोन्नती परिषदेचे फलटणचे अध्यक्ष करण भांबुरे, उपाध्यक्ष श्रीकांत मुळे, मोहन जामदार, राजेंद्र गाटे, विजय उंडाळे, सुनील पोरे, मनीष जामदार, शेखर हेंद्रे, विजय कुमठेकर, राहुल जामदार, मनोहर जामदार, संतनामदेव महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पद्मा टाळकुटे, उपाध्यक्षा सौ. अंजली कुमठेकर यांच्यासह समाज बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या श्री क्षेत्र पंढरपूर (महाराष्ट्र) या जन्मभूमी ते तिर्थक्षेत्र असलेल्या श्री क्षेत्र घुमान (पंजाब) या कर्मभूमी पर्यंत भागवत धर्म प्रसारक मंडळ, पालखी सोहळा पत्रकार संघ, श्री नामदेव दरबार कमिटी घुमान व देशभरातील विविध नामदेव शिंपी समाज संघटनांच्या वतीने शांती, समता व बंधूता या संत विचारांचा व संत साहित्याचा प्रचार व प्रसार करीत श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमान अशी रथ व सायकल यात्रा काढण्यात आली होती.

महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, दिल्ली, हरियाणा, पंजाब, राजस्थान व गुजरात या राज्याचा एक महिन्याचा दौरा करुन ही यात्रा शुक्रवारी महानुभाव पंथाची दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या ऐतिहासीक फलटण नगरीत दाखल झाली.

फलटणचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्रीराम मंदिरात या रथयात्रेचे स्वागत करण्यात आले व श्रीराम मंदिरात संत नामदेव महाराज पादुकांची पूजा व आरती करण्यात आली. त्यानंतर श्रीराम मंदिर ते श्री विठ्ठल मंदिर अशी भव्य रथयात्रा काढण्यात आली.

यामध्ये फलटण शहरातील शिंपी समाज बंधू व भगिनींसह वारकरी सहभागी झाले होते. मिरवणुकीच्या मार्गावर शिंपी समाजातील सुवासिनींनी सडा, रांगोळी टाकून पंचारातीने ओवाळून स्वागत केले.

श्री विठ्ठल मंदिरात पादुकांची पूजा व अभिषेक शिंपी समाज विठ्ठल मंदिर ट्रस्टचे नूतन अध्यक्ष राजेश हेंद्रे यांनी सपत्नीक केला. घुमाण यात्रेत सहभागी सायकल यात्रींचा व भजनी मंडळाचा शाल व श्रीफळ देवून महाराष्ट्र राज्य पालखी सोहळा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सुभाष भांबुरे व मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी भागवत धर्म प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे यांच्यासह वारकरी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!