संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहोळा सर्वांना सुविधा देण्याचा प्रयत्न यशस्वी : मुख्याधिकारी संजय गायकवाड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २४ जून २०२३ । फलटण । श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा फलटण मुक्कामी असताना माऊलींच्या प्रवेशापासून सोहोळा बरड कडे मार्गस्थ होईपर्यंतच्या कालावधीत नगर परिषदेच्या माध्यमातून वारकरी, दिंडीकरी, भाविकांना आवश्यक सर्व सुविधा देण्याचा यशस्वी प्रयत्न केला त्यामध्ये नगर परिषद अधिकारी कर्मचाऱ्यांची उत्तम साथ आणि प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे उत्तम मार्गदर्शन लाभल्याचे नगर परीषद प्रशासक तथा मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी सांगितले.

फलटण नगर परिषदेमार्फत सोहोळा सोबत येणाऱ्या वारकरी व भाविकांसाठी पाणी पुरवठा, आरोग्य सेवा व विद्युत व्यवस्था उत्तम करण्यात आली. सतत पाणी पुरवठा, अग्निशमन दल, मदत व मार्गदर्शन कक्ष इत्यादी सेवा सुविधा पुरवण्यात आल्या होत्या. दर्शनबारीसाठी प्रथमच नगर परिषद कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. दिव्यांगासाठी स्वतंत्र दर्शन व्यवस्था निर्माण करण्यात आल्याचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी निदर्शनास आणून दिले.

पालखीतळावर १० ठिकाणी निर्मल वारी फिरते शौचालयाची व्यवस्था करण्यात आली होती, मैला डिस्पोजल तात्काळ करण्यात आल्यामुळे भाविकांच्या व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने उत्तम काळजी घेतली गेल्याचे संजय गायकवाड यांनी सांगितले.

सोहोळा येथे दाखल झाल्यापासून दि. २१ जून रोजी रात्री १२ वाजले पासून पालखी तळावरील स्वच्छता करणेकामी कर्मचारी नेमण्यात आले होते. सदरच्या कर्मचाऱ्यां मार्फत पालखी तळावरील स्वच्छता केली. आज सकाळी ६ नंतर माऊलीचे प्रस्थान बरड कडे झाल्यानंतर नगर परिषद आरोग्य विभागाकडून सर्व १५० कर्मचारी वर्ग २ स्वच्छता निरीक्षक ८ मुकदम, १६ घंटागाड्या, ४ ट्रॅक्टर ट्रॉली, २ ट्रॅक्टर ड्रोजर इत्यादी साधनांचा वापर करुन संपूर्ण पालखी तळ अवघ्या ३ तासात स्वच्छ करण्यात आला आहे.

पालखी तळावरुन सुमारे १२ ते १५ टन इतका कचरा संकलन करण्यात आला आहे, तसेच शहरातील विविध भागातील स्वच्छता सकाळी ६ ते १० या वेळेत करुन शहरांमधून सुमारे १५ टन कचरा संकलन करण्यात आला आहे. जिल्ह्यातील इतर नगर परिषदेकडून उपलब्ध झालेले १०० कर्मचारी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मधील राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत १०० विद्यार्थी तसेच फलटण येथील मुधोजी कॉलेज राष्ट्रीय सेवा योजनेतील १०० विद्यार्थी यांनी उत्स्फूर्तपणे व शिस्तबद्ध रीतीने स्वच्छतेसाठी सहभाग नोंदवला त्यामुळे विक्रमी वेळेत फलटणमधील शहरातील व पालखीतळावरील स्वच्छता करणे शक्य झाले. नगरपरिषदे कडून सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आल्याचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी सांगितले.

नगर परिषदेच्या सर्वच विभागाचे सर्व कर्मचारी यांनी अहोरात्र अविरत काम केले. वरिष्ठांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन, महसूल विभाग, पोलीस विभाग, महावितरण, एसटी महामंडळ इत्यादी सर्व विभागाने चांगल्या प्रकारे सहकार्य केल्याचे सांगताना शहरातील स्वयंसेवी संस्था, नागरिक यांनी अन्नदान करुन वारकऱ्यांची काळजी घेतली. श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे नगर परिषदेच्या वतीने जाहीर आभार मानत असल्याचे प्रशासक तथा मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी सांगितल.


Back to top button
Don`t copy text!