दैनिक स्थैर्य । दि. ०३ नोव्हेंबर २०२२ । फलटण । संत नामदेव महाराज पालखी सोहोळा व सायकल यात्रा शुक्रवार दि. ४ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता फलटण तालुक्यात प्रवेश करणार असून तालुक्याच्यावतीने साधू बुवा महाराज मंदिर, राजुरी येथे आणि त्यानंतर फलटण शहरात क्रांतिसिंह नाना पाटील चौक येथे सोहोऴयाचे यथोचित स्वागत करण्यात येणार आहे.
नामदेव समाजोन्नती परिषद, पालखी सोहळा पत्रकार संघ आणि भागवत धर्म प्रसारक समिती यांच्या संयुक्त सहभागाने शुक्रवार दि. ४ नोव्हेंबर ते शनिवार दि. ४ डिसेंबर या कालावधीत श्री क्षेत्र पंढरपूर (महाराष्ट्र) ते श्री क्षेत्र घुमान (पंजाब) या ३० दिवसांच्या संत. नामदेव महाराज पालखी सोहळा व भव्य सायकल यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
तालुक्याच्या सीमेवर साधू बुवा महाराज मंदिर येथे आमदार दिपकराव चव्हाण, श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण तालुका सहकारी दूध पुरवठा संघाचे चेअरमन धनंजय पवार, राजुरीचे सरपंच सचिन पवार यांच्यासह राजुरी, कुरवली, मुंजवडी पंचक्रोशीतील विविध संस्थांचे पदाधिकारी, सरपंच, सोसायट्यांचे चेअरमन, विविध भजनी मंडळे, किर्तनकार, प्रवचनकार आणि भक्त मंडळी या सोहळ्याचे यथोचित स्वागत करणार आहेत.
फलटण शहरात क्रांतिसिंह नाना पाटील चौक येथे महाराष्ट्र विधान परिषद माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले, महाराष्ट्र सहकार परिषद माजी अध्यक्ष व दि यशवंत को – ऑप. बँकेचे चेअरमन शेखर चरेगावकर, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, विविध संस्थांचे पदाधिकारी, तालुक्यातील किर्तनकार, प्रवचनकार, विविध भजनी मंडळे, ह.भ.प. गणपतराव तथा बबनराव बाबुराव निकम, ह.भ.प. केशव महाराज जाधव व त्यांचे सहकारी आणि शिंपी समाज विठ्ठल मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष व त्यांचे सहकारी,शिंपी समाज महिला मंडळ अध्यक्ष व सहकारी, फलटण शहर व परिसरातील भाविक भक्त उपस्थित राहणार आहेत.
त्याच बरोबर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, उप विभागीय पोलिस अधिकारी तानाजीराव बरडे, तहसीलदार समीर यादव, गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे पवार, अ. भा. मराठी पत्रकार परिषद सातारा जिल्हाध्यक्ष हरिष पाटणे व त्यांचे सहकारी सर्व पत्रकार, पालखी सोहोळा पत्रकार संघाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे व त्यांचे सहकारी पत्रकार यावेळी उपस्थित राहणार आहेत.
संत नामदेव महाराज पालखी सोहोळा व सायकल यात्रेचा शुक्रवार दि. ४ रोजी येथील शिंपी समाज विठ्ठल मंदिरात मुक्काम असून तेथून सकाळी ६ वाजता सोहोळा तरडगाव कडे मार्गस्थ होईल.
संत नामदेव महाराज यांचा जन्म दि. २६ ऑक्टोंबर १२७० मध्ये पंढरपूर येथे झाला आणि दि. ३ जुलै १३५० रोजी त्यांनी संजीवन समाधी घेतली. ८० वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले. शिखांच्या गुरु ग्रंथ साहिबातले चरित्रकार, आत्म चरित्रकार आणि ‘कीर्तना’च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत भागवत धर्माचा प्रचार व प्रसार त्यांनी महाराष्ट्रासह शेजारच्या राज्यातही पायी प्रवास करुन केला, पंजाब मध्ये तर त्यांचे काही अभंग पंजाबी धर्म ग्रंथात समाविष्ट करण्यात आले आहेत.