दैनिक स्थैर्य | दि. 14 जुलै 2024 | पंढरपूर | संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या श्री क्षेत्र पंढरपूर (महाराष्ट्र) ते श्री क्षेत्र घुमाण (पंजाब) या सुमारे २५०० किलोमिटर रथ व सायकल यात्रेच्या लोगोचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
पालखी सोहळा पत्रकार संघ, भागवत धर्म प्रसारक मंडळ व श्री नामदेव दरबार कमिटी श्री क्षेत्र घुमाण यांच्या संयुक्त विद्यमानाने कार्तिक शुध्द एकादशी ते मार्गशीर्ष शुध्द एकादशी अशी सुमारे ३० दिवसांची रथ व सायकल यात्रा काढली जाते. ही यात्रा महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, दिल्ली, हरियाणा व पंजाब या राज्यातून जाते तर परतीला उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश राज्यातुन येते. यात्रेचे हे तीसरे वर्ष आहे.
पंढरपूर येथे पालखी सोहळा पत्रकार संघ व भागवत धर्म प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे, उपाध्यक्ष शंकर टेमघरे, सचिव ॲड. विलास काटे, सहसचिव राजेंद्रकृष्ण कापसे, शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले, भागवत महाराज चौरे, सुधाकर महाराज इंगळे आदीनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवुन त्यांच्या हस्ते लोगोचे अनावरण केले.
यावेळी बंदर विकास मंत्री ना. दादासो भुसे, आरोग्य मंत्री ना. डॉ. तानाजी सावंत, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पत्रकार संघाच्या वतीने घुमाण येथे संत नामदेव महाराष्ट्र भवनसाठी एक कोटी निधी द्यावा; घुमाण रथ व सायकल यात्रेत सहभागी वारक-यांसाठी मोफत एस टी बस द्यावी, संत साहित्य प्रसिध्दीसाठी प्रत्येक संस्थानला वार्षिक २५ लाखाचा निधी द्यावा, पंढरपूर येथे संत साहित्य अभ्यासासाठी संत नामदेव भवन बांधावे आदी मागण्याचे निवेदन देण्यात आले.