
स्थैर्य, दुधेबावी, दि. २६ ऑक्टोबर : दुधेबावी (ता. फलटण) येथील ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित संत गाडगेबाबा व्याख्यानमालेच्या रौप्य महोत्सवी वर्षाला शनिवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी उत्साहात सुरुवात झाली. बुधवार, दि. २९ ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या व्याख्यानमालेत कायदेविषयक मार्गदर्शन, तरुणाईचे प्रश्न, पालकत्व, अध्यात्म आणि आदर्श युवक यांसारख्या विविध विषयांवर नामवंत वक्त्यांची व्याख्याने होणार आहेत. दररोज सायंकाळी ७ वाजता व्याख्यानाला सुरुवात होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत सोनवलकर यांनी दिली.
रौप्य महोत्सवी वर्षाचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्षस्थानी दिल्लीचे सहाय्यक जिल्हाधिकारी ओंकार गुंडगे (IAS) होते. उद्घाटन सोहळ्यास दहिवडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत, शिक्षक नेते संभाजीराव थोरात, उदयराव शिंदे, सेवानिवृत्त संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश्वर पुस्तके, राष्ट्रीय शिक्षक संघाचे बलवंत पाटील, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक माणिकराव सोनवलकर, शिक्षक बँकेच्या चेअरमन पुष्पलता बोबडे, पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ, पोलीस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष हणमंतराव सोनवलकर, कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे, उपविभागीय अभियंता दिग्विजय सोनवलकर, सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता दिनकरराव सोनवलकर, पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाषराव सोनवलकर आणि सरपंच भावनाताई सोनवलकर यांची प्रमुख उपस्थिती होती. व्याख्यानमाला कमिटीचे अध्यक्ष डॉ. सागर कराडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
उद्घाटन सत्रात न्यायमूर्ती संजय देशमुख यांनी उपस्थितांना कायदेविषयक मार्गदर्शन केले. या सत्राच्या अध्यक्षस्थानी फलटण बार असोसिएशनचे अध्यक्ष नितीन जाधव होते, तर प्राध्यापक पोपटराव मिंड आणि दारूबंदी विभागाच्या पोलीस उपनिरीक्षक अक्षदा नाळे-साबळे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
व्याख्यानमालेचे पुढील वेळापत्रक:
- रविवार, दि. २६ ऑक्टोबर: प्राध्यापक रवींद्र कोकरे यांचे ‘भरकटलेली तरुणाई’ या विषयावर व्याख्यान होईल. अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री कार्यालयाचे अवर सचिव धीरज अभंग असतील. प्रमुख पाहुणे म्हणून सुभाषराव भांबुरे आणि कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे उपस्थित राहतील.
- सोमवार, दि. २७ ऑक्टोबर: प्रसिद्ध वक्ते प्रा. वसंतराव हंकारे यांचे ‘बाप समजावून घेताना’ या विषयावर व्याख्यान होईल. अध्यक्षस्थानी फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे असतील. प्रमुख पाहुणे म्हणून किरण बोळे आणि जामखेडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर उपस्थित राहतील.
- मंगळवार, दि. २८ ऑक्टोबर: प्रसिद्ध वक्ते इंद्रजीत देशमुख ‘पसायदान’ या विषयावर निरूपण करतील. अध्यक्षस्थानी कुंडल येथील वन प्रबोधिनीचे प्रा. हरिश्चंद्र वाघमोडे (IFS) असतील. प्रमुख पाहुणे म्हणून यशवंत खलाटे-पाटील आणि मुंबईचे पोलीस उपनिरीक्षक सागर नाळे उपस्थित राहतील.
- बुधवार, दि. २९ ऑक्टोबर: प्रसिद्ध बालव्याख्याती कुमारी राजनंदिनी पडर ‘माझ्या स्वप्नातील आदर्श युवक’ या विषयावर आपले विचार मांडेल. अध्यक्षस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारचे पोलीस उपअधीक्षक राजेश वाघमारे असतील. प्रमुख पाहुणे म्हणून विकास शिंदे आणि सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय दडस उपस्थित राहणार आहेत.
या पाच दिवसीय व्याख्यानमालेचा लाभ घेण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष विजयकुमार नाळे, कार्याध्यक्ष संतोष भांड, खजिनदार डॉ. युवराज एकळ आणि सचिव विठ्ठल सोनवलकर यांनी केले आहे.

