
स्थैर्य, फलटण, दि. १९ नोव्हेंबर : फलटण नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीला (खासदार गट) मोठे यश मिळाले आहे. संत बापूदास नगर परिसरातील युवा नेतृत्व दीपक शिंदे यांनी आज शिवसेना (शिंदे गट) ला रामराम ठोकून भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांनी आपल्या पत्नीचा, सौ. आरती दीपक शिंदे यांचा प्रभाग क्रमांक ७ मधील उमेदवारी अर्ज मागे घेत महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे.
फलटण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ ही भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) यांच्या महायुतीमार्फत लढवली जात आहे. या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ७ मधून महायुतीचे उमेदवार म्हणून अशोक जयवंतराव जाधव (सर्वसाधारण पुरुष) आणि सौ. स्वाती राजेंद्र भोसले (सर्वसाधारण महिला) हे रिंगणात आहे.
याच प्रभागातून दीपक शिंदे यांच्या पत्नी सौ. आरती दीपक शिंदे यांनी अपक्ष तसेच शिवसेना (शिंदे गट) यांच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, आज अर्ज मागे घेण्याच्या दिवशी दीपक शिंदे यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या नेतृत्वावर आणि विकासकामांवर विश्वास ठेवून हा अर्ज मागे घेतला.
यावेळी बोलताना उमेदवार अशोकराव जाधव म्हणाले, “प्रभाग क्रमांक ७ मध्ये आम्ही दोघे महायुतीचे उमेदवार असताना, आरती दीपक शिंदे यांनी अपक्ष आणि शिवसेनेच्या वतीने अर्ज भरला होता. मात्र, रणजितदादा आणि सचिन पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे आणि आम्हाला पाठिंबा दिला आहे. आम्ही त्यांचे पक्षात स्वागत करतो आणि त्यांचा योग्य तो मान-सन्मान राखला जाईल, अशी ग्वाही देतो.”
दीपक शिंदे यांनी यावेळी सांगितले की, प्रभागाचा आणि शहराचा विकास करण्यासाठी महायुतीशिवाय पर्याय नाही. त्यामुळेच आपण भाजपमध्ये प्रवेश केला असून, प्रभाग ७ मधील महायुतीचे उमेदवार अशोक जाधव आणि स्वाती भोसले यांना मताधिक्याने निवडून आणण्यासाठी आपण पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार आहोत.
या पक्षप्रवेशामुळे प्रभाग क्रमांक ७ मध्ये महायुतीची बाजू भक्कम झाली असून, विरोधातील मते फुटण्याची शक्यता कमी झाली आहे.

