
दैनिक स्थैर्य । 19 जून 2025 । सातारा। संस्कृत भाषा अध्ययनातून भारतीय संस्कृती व व भारतीय संस्काराची बीजे बालवयातच रुजण्यासाठी येथील शिक्षण मंडळातर्फे इयत्ता पहिली म्हणजे नवीन शिक्षण धोरणातील पायाभूत स्तरापासूनच विद्यार्थ्यांत रुजवले जाणार आहेत.
नवीन शिक्षण धोरण 2020 नुसार बहुभाषिकतेला प्राधान्य दिले आहे. संस्कृत भाषा सर्व भाषांची जननी आहे. म्हणून भाषिक क्षमता व संवाद कौशल्य विकसित करण्यासाठी, उच्चारण सुधारण्यासाठी संस्कृत भाषा अध्ययन व अध्यापन इयत्ता पहिलीपासूनच शिक्षण मंडळाच्या सर्व प्राथमिक गटातील शाखांत शिकवली जाणार आहे. यासाठीशिक्षण मंडळाने स्वतःचा संस्कृत भाषेचा अभ्यासक्रम तयार केला आहे. तो राबवण्यासाठी प्रशिक्षित शिक्षकांची म्हणजे साधन व्यक्तींची फळीही तयार केली आहे. संस्कृत भाषेचा ’मधुर संस्कृतम’ हा प्राथमिक अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. नूतन मराठी शाळा, इंग्रजी माध्यमाची प्राथमिक शाळा, एसएमएस, बालविद्यालय, ओगलेवाडी या संस्थेच्या प्राथमिक शाळांतून या संस्कृत भाषेचा अभ्यासक्रम राबवला जाणार आहे. संस्कृत भाषेतून भारतीय संस्कृतीचे संस्कार होण्यासाठी प्रतिवर्षी भगवद्गीतेतील एका अध्यायाची संस्था विद्यार्थ्यांना दिली जाते.
संपूर्ण भगवद्गीता केवळ दोन मिनिटांत लिहून पूर्ण करण्याचा विक्रमही लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये संस्थेने नोंदवला आहे. संस्कृत भाषा अध्ययन सुकर होण्यासाठी संस्थेतर्फे ’सांस्कृतिका’ ही संस्कृत भाषा प्रयोगशाळाही उभारण्यात आली आहे. संस्कृत अध्यापिका माधुरी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेतील सर्व संस्कृत शिक्षकांनी ’सांस्कृतिका’च्या उभारणीत योगदान दिलें आहे. परिसरातील सर्व शैक्षणिक संस्थांनी सांस्कृतिके’ला भेट देऊन संस्कृत भाषेचे उपक्रम जाणून घ्यावेत, असे आवाहन शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कुलकर्णी, उपाध्यक्ष अनघा परांडकर, चंद्रशेखर देशपांडे, राजेंद्र लाटकर व संचालकांनी केले आहे.