
दैनिक स्थैर्य | दि. १५ मार्च २०२३ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालयाच्या तत्त्वज्ञान विभागाने परमपूज्य उपळेकर महाराज मंदिर ट्रस्टशी देवाण-घेवाण विषयक करार केलेला असून त्याअंतर्गत १५ मार्च २०२३ रोजी महाविद्यालयात हभप रामदास महाराज कदम यांचे संकीर्तन आयोजित केले होते.
तत्त्वज्ञान सप्ताहाच्या निमित्ताने आज कीर्तनासारखा कार्यक्रम प्रथमच महाविद्यालयात आयोजित करण्यात आला. याप्रसंगी प्रा. रामदास महाराज यांनी युवा पिढीला काळाला साजेसे मार्गदर्शन केले.
रामदास महाराज म्हणाले की, आजच्या युवकांनी प्रेम म्हणजे काय, हे समजून घ्यावे व खरे प्रेम आपले दैवत असणार्या आई-वडिलांवर करावे. आई-वडीलांना दैवत मानावे. कारण देव अन्यत्र नसून साक्षात आई-वडिलांमध्येच असतो. असे सांगून त्यांनी आपल्या नर्म विनोदाने तरुणांपुढे संतांचे जीवनचरित्र उलगडून दाखवले. काळ कोणताही असला तरी संतांचे जीवन हेच खरे आपले मार्गदीप ठरू शकते, असे सांगितले. युवकांनी सामाजिक आणि कौटुंबिक भान ठेवत वागले पाहिजे. आपले आचरण शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. संत समाज आणि आई-वडील हीच आपली दैवते होत. त्यांना पुढे ठेवून आपण आयुष्यात वाटचाल केली पाहिजे.
हभप रामदास महाराजांना यावेळी भोसले महाराज, खांडे महाराज, माऊली महाराज, यांनी समर्थ टाळ व गायनाची साथ दिली, तर ओंकार दाणे आणि अनिकेत जाधव या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मृदंग वादनाची उत्कृष्ट साथ दिली. महाविद्यालयाच्या इतिहासामध्ये प्रथमच सुश्राव्य अशा कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला.
तत्त्वज्ञानासारख्या विषयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक, आध्यात्मिक दृष्टिकोन विकसित करून समाजामध्ये प्रबोधनाच्या माध्यमातून परिवर्तन घडवून आणू शकतात. किर्तन हे एक प्रबोधनाचे प्रभावी माध्यम समाजमान्य असल्याने बदलत्या परिस्थितीनुसार कीर्तनकार समाजातील सर्वच घटकांचे प्रबोधन करू शकतात, असे प्रतिपादन प्रभारी प्राचार्य डॉ. पी.एच. कदम यांनी केले.
कार्यक्रमाला प.पू. गोविंद महाराज उपळेकर समाधी मंदिर संस्थेचे उपाध्यक्ष श्री. अनिरुद्ध रानडे साहेब मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. किर्तन समारंभाचे प्रास्ताविक डॉ. नवनाथ रासकर यांनी केले तर आरंभी सर्व उपस्थित मान्यवरांचे यथोचित स्वागत उपप्रचार्य डॉ. दीक्षित एस जी यांनी केले.
आभार प्रा. सतीश पवार यांनी मानले, तर सूत्रसंचालन प्रा. अभिजित धुलगुडे यांनी केले. कीर्तनाच्या या कार्यक्रमास डॉ. पी. आर. पवार, डॉ. टी. पी. शिंदे, डॉ. ए. एस. टीके, डॉ. ए. एन. शिंदे, डॉ.सौ. एस.एल. नाईक निंबाळकर व अन्य प्राध्यापक वृंद आणि महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. संजय दीक्षित उपस्थित होते.