दैनिक स्थैर्य | दि. ०९ फेब्रुवारी २०२५ | फलटण | सातारा जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रातील एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे, ज्यामध्ये विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटण आणि पुणे येथील निवासस्थानी आयकर विभागाने केलेली धाड संपल्याची माहिती समोर आली आहे.
बुधवारी दि. ०५ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता आयकर विभागाचे अधिकारी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या ‘सरोज व्हिला’ या बंगल्यावर दाखल झाले होते. या धाडीमुळे फलटण परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. संजीवराजे नाईक निंबाळकर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते आहेत आणि ते येत्या काही दिवसांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश करणार होते, असे बोलले जात होते.
आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी आणि त्यांच्या गोविंद मिल्क दूध डेअरी या प्रकल्पावर चौकशी सुरू केली होती. या चौकशीत प्रामुख्याने गोविंद मिल्कशी निगडित असलेल्या आर्थिक व्यवहारांची तपासणी करण्यात आली होती. बंगल्यामध्ये आत कोणालाही प्रवेश दिला जात नव्हते, यामुळे कार्यकर्त्यांनी बंगल्याच्या परिसरात गर्दी केली होती.
चौकशी संपल्यानंतर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की आयकर विभागाच्या माध्यमातून केलेली चौकशी अखेर संपली आहे. त्यांनी नमूद केले की या चौकशीत काहीही निष्पन्न झाले नाही आणि आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी गोविंद मिल्कच्या कामकाज योग्य व शिस्तीत असल्याचे मान्य केले आहे. आता काय वातावरण सुरू आहे हे सर्वांना माहित आहे, पण यामध्ये राजकारण आहे की नाही हे त्यांना माहित नाही.
या धाडीमागे राजकीय आकस बाळगून ही कारवाई होत असल्याचा आरोप माजी आमदार दीपक चव्हाण यांनी यापूर्वीच केला आहे.