
आगामी निवडणुकांच्या तोंडावर फलटणमध्ये भाजपला खिंडार. गोखळीतील माजी जि.प. सदस्य प्रा. अनिल जगताप यांनी भाजप सोडून राजे गटात केला प्रवेश. “विरोधकांनी उमेदवारीचे लिलाव मांडलेत,” संजीवराजे नाईक निंबाळकरांचा घणाघात. वाचा सविस्तर…
स्थैर्य, फलटण, दि. 10 जानेवारी : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे वारे वाहू लागताच गोखळी (ता. फलटण) येथील ज्येष्ठ नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. डॉ. अनिल जगताप व त्यांच्या पत्नी माजी उपसरपंच हेमलता जगताप यांनी भारतीय जनता पार्टीला (BJP) रामराम ठोक करत पुन्हा एकदा ‘राजे गटात’ (शिवसेना) स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला आहे. हा भाजपसाठी धक्का मानला जात असून, या प्रवेश सोहळ्यात सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी विरोधकांवर तोफ डागली.
“उमेदवारीचा लिलाव ही लोकशाहीची चेष्टा”
गोखळी येथे पार पडलेल्या या हायव्होल्टेज कार्यक्रमात बोलताना संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, “सध्या तालुक्याच्या राजकारणात एक विकृत प्रथा सुरू झाली आहे. विरोधकांनी चक्क उमेदवारीचे लिलाव मांडले आहेत. ‘तू किती पैसे लावणार?’ या एकाच निकषावर उमेदवारी देणे, हे लोकशाहीसाठी अत्यंत दुर्दैवी आणि घातक आहे. ज्यांच्याकडे पैसा नाही, त्या सर्वसामान्य निष्ठावंत कार्यकर्त्याने मग कोठे जायचे?”
संजीवराजे पुढे म्हणाले की, “आम्ही ३० वर्षांच्या सत्तेत कधीही कोणाचे आयते प्रवेश घेतले नाहीत, तर आम्ही तळागाळातून कार्यकर्ते ‘घडवले’. आज जे ३० वर्षांत उभे केले आहे, ते टिकवण्यासाठी आता कार्यकर्त्यांनी मोठ्या संघर्षाची तयारी ठेवावी. पालखी मार्ग असो किंवा निरा देवघर, ही कामे जुनीच आहेत; पण सध्याचे लोकप्रतिनिधी फक्त फलक लावून श्रेय लाटण्याचा सपाटा लावत आहेत. स्मशानभूमीच्या कामावरही स्वतःचे बोर्ड लावणारी ही प्रवृत्ती किती खालच्या पातळीवर गेली आहे, हे जनतेने ओळखावे.”
“भाजपमध्ये गेलो, पण अपमान पदरी पडला” : अनिल जगताप
आपल्या घरवापसीचे कारण स्पष्ट करताना प्रा. अनिल जगताप यांनी मनातील खदखद व्यक्त केली. ते म्हणाले, “काही कारणास्तव मी भाजपमध्ये गेलो होतो, पण तिथे निष्ठेपेक्षा पैशाला जास्त किंमत आहे. कार्यकर्त्याला सन्मान मिळत नाही, खुर्चीच्या रांगेत मागे बसवले जाते. तिथले वास्तव भयानक आहे. विशेष म्हणजे, समोरच्या गटाने मला अडीच लाख रुपयांची ऑफर दिली होती, पण स्वाभिमान विकून राजकारण करणे माझ्या रक्तात नाही. राजे गटात विकासाची दृष्टी आणि कार्यकर्त्याला सन्मान आहे, म्हणूनच मी पुन्हा माझ्या परिवारात परतलो आहे.”
श्रेयवादाची लढाई माजी आमदार दीपक चव्हाण यांनी यावेळी बोलताना रामराजे नाईक निंबाळकर यांच्या विकासकामांचा पाढा वाचला. “रामराजे यांनी तालुक्यात पाणी आणले, एमआयडीसी आणली आणि कारखानदारी उभी केली. विरोधक आज ज्या कामांचे श्रेय घेण्यासाठी धडपडत आहेत, त्या कामांच्या मंजुरी आणि निधीची मूळ तरतूद रामराजे यांच्याच काळात झाली होती. जनतेला हे सत्य माहित आहे,” असा टोला त्यांनी लगावला.
या शक्तीप्रदर्शन सोहळ्यास युवा नेते विश्वजितराजे नाईक निंबाळकर, शिवसेना जिल्हा समन्वयक विराज खराडे, बजरंग खटके यांच्यासह गोखळी आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

