
‘शिवसेनेच्या माध्यमातूनच पूर्ण ताकदीने लढणार’; श्रीमंत संजीवराजेंचा कार्यकर्त्यांना आदेश. अनंत मंगल कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक.
स्थैर्य, फलटण, दि. 27 डिसेंबर : फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीत सत्तांतर झाले असले, तरी खचून न जाता राजे गटाने पुन्हा एकदा जोमाने कंबर कसली आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका शिवसेनेच्या माध्यमातून संपूर्ण ताकदीने लढवण्याचा निर्धार सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे.
फलटण येथील अनंत मंगल कार्यालय येथे शिवसेनेच्या अर्थात राजे गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत पराभवाची कारणमीमांसा न करता भविष्यातील राजकीय वाटचालीवर चर्चा करण्यात आली.
या महत्त्वपूर्ण बैठकीस सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष नानासाहेब उर्फ पिंटूशेठ इवरे यांच्यासह तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तात्काळ कामाला लागण्याचे आदेश
फलटण नगरपरिषदेची निवडणूक नुकतीच संपन्न झाली असून, यात राजे गटाला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, या निकालाने विचलित न होता श्रीमंत संजीवराजे यांनी तत्काळ संघटनात्मक बांधणीकडे लक्ष दिले आहे. “झाला गेला पराभव विसरून कार्यकर्त्यांनी आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी सज्ज व्हावे. या आगामी निवडणुका आपण शिवसेनेच्या चिन्हावर आणि झेंड्याखाली पूर्ण ताकदीने लढवणार आहोत,” असे स्पष्ट मत श्रीमंत संजीवराजे यांनी व्यक्त केले.
श्रीमंत संजीवराजेंच्या या आक्रमक पवित्र्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, नगरपालिकेपाठोपाठ आता ग्रामीण भागातही राजकीय वातावरण तापणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

