
स्थैर्य, फलटण, दि. 23 नोव्हेंबर : “प्रभाग क्रमांक ४ हा राजे गटाचा बालेकिल्ला आहे आणि येथून आमचा विजय निश्चित आहे. तिकिटासाठी अनेकजण इच्छुक होते, पण सर्वांनी समंजसपणा दाखवला. ही निवडणूक आपण शिवसेनेच्या माध्यमातून ‘धनुष्यबाण’ चिन्हावर लढवत असून, दोन्ही उमेदवारांसह नगराध्यक्षपदाचे उमेदवार अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा,” असे आवाहन फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी आणि ज्येष्ठ नेते श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
फलटण नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ४ मधील उमेदवार सौ. रुपालीताई सुरज जाधव आणि अझरुद्दीन (पप्पू) ताजुद्दीन शेख यांच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी गणपती मंदिरात नारळ वाढवून प्रचाराची सुरुवात करण्यात आली.
इच्छुकांचे मानले आभार, एकजुटीचे दर्शन संजीवराजे म्हणाले, “या प्रभागातून अनेकजण उमेदवारीसाठी इच्छुक होते. सर्वांचे काम मोठे आहे आणि सर्वजण तुल्यबळ होते. मात्र, एका प्रभागात दोनच उमेदवार देता येतात. यावेळी सत्यजित घोरपडे, किशोरसिंह नाईक निंबाळकर, राजू बागवान, ॲड. जाधव अशा सर्वांनी अत्यंत समंजसपणाची भूमिका घेतली. ज्यांनी उमेदवारी मागितली होती, त्यांनीच आता एक दिलाने काम सुरू केले आहे, हेच या प्रभागाचे आणि गटाचे यश आहे.”
प्रभाग ४: राजे गटाचा बालेकिल्ला “फलटणच्या विकासाच्या गाभ्यात असलेला हा प्रभाग आमचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. नितीनभैया भोसलेंनी येथे योग्य मार्गदर्शन केले आहे. आपले दोन्ही उमेदवार आणि नगराध्यक्षपदासाठी अनिकेतराजे हे स्वतः रिंगणात आहेत. त्यामुळे ताकदीने कामाला लागा आणि विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल, अशा पद्धतीने मताधिक्य द्या,” असे आवाहन संजीवराजे यांनी कार्यकर्त्यांना केले.
यावेळी उमेदवारांसह आजी-माजी नगरसेवक, महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभागात काढण्यात आलेल्या रॅलीला मतदारांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
