स्थैर्य, फलटण : पक्ष स्थापनेपासून राष्ट्रवादीत सक्रीय असलेल्या आणि शांत, संयमी व अभ्यासू अशी प्रतिमा असलेल्या श्रीमंत संजीवराजे यांना राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेवर घ्यावे, अशी मागणी विंचूर्णी गावचे सरपंच लायन रणजीतभाऊ निंबाळकर यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केलेली आहे.
फलटण तालुक्यासह संपूर्ण सातारा जिल्ह्यात श्रीमंत संजीवराजे यांचा व्यापक जनसंपर्क आहे. श्रीमंत संजीवराजे यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये समाजकारण व राजकारणात प्रवेश केला. कोणत्याही पक्षाचा आधार नसताना अपक्ष भूमिकेतून त्यांनी आपला राजकीय प्रवास सुरु केला व याच माध्यमातून त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत समाजकारण व राजकारणात प्रवेश केला. नंतर फलटण पंचायत समिती जिंकून सभापती या नात्याने राजकारणाची व समाजकारणाची मुहूर्तमेढ रोवली. मिळालेल्या संधीचा सुयोग्य वापर करुन तालुकाभर भ्रमंती करुन लोकसंपर्क सुरु केला. या लोकसंपर्काचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला झाला.
प्र्रत्येक पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक त्यांनी राष्ट्रवादीच्या माध्यमातून लढविली. एवढेच नव्हे तर अनेक जिल्हा परिषद मतदार संघातून त्यांनी प्रचंड मतांनी विजयी होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम केले. श्रीमंत संजीवराजेंच्या प्रचंड परिश्रमामुळेच शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस घरोघरी पोहोचली व पवार साहेबांच्या विचारांची बांधिलकी फलटण तालुक्याने स्विकारली. या कष्टमय प्रवासात लहान वयाचे असूनही श्रीमंत संजीवराजे सर्वांचे ‘बाबा’ झाले. हा इतिहास आहे. आज संपूर्ण तालुकाच नव्हे तर सातारा जिल्ह्यातील अनेक लोकांचे ते आदरणीय व्यक्तीमत्त्व म्हणून ओळखले जाते. तालुक्यातील ग्रामपंचायती, विकास सोसायट्यांपासून नगरपरिषदेच्या सर्व ठिकाणी श्रीमंत संजीवराजेंचा शब्दा हा अंतिम आहे आणि हे सर्व स्वकष्टातून व लोकसेवा व लोकप्रेमातून श्रीमंत संजीवराजेंनी मिळवले आहे. राज्यपाल नियुक्ती कोट्यातून विधानपरिषदेकरीता श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना संधी मिळावी अशी तमाम कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचेही नमूद करुन ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदेमध्ये गेली 30 वर्षे काम करणार्या या सुजाण व सुसंस्कृत व विचारी नेत्याला महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेवर काम करण्याची संधी मिळावी, अशी आग्रही मागणी लायन रणजितभाऊ निंबाळकर यांनी केलेली आहे.