स्थैर्य,मुंबई, दि.१७: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी शिवसेना नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्यावर विरोधकांकडून गंभीर आरोप केले जात आहेत. याशिवाय पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येला दहा दिवस उलटून गेले आहेत. या प्रकरणी भाजप नेत्यांकडून राठोड यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. मात्र, त्यांनी अद्यापही प्रसारमाध्यमांसमोर आपली भूमिका मांडलेली नाही. त्याचबरोबर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतही ते उपस्थित नव्हते. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली.
“पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात कोणालाही पाठीशी घालायचे काही कारण नाही. कोणीही व्यक्ती असूदे जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत एखाद्याला त्या पदावरुन हटवायचं हे कितपत योग्य आहे? याचा विचार करावा लागेल”, असं मत अजित पवार यांनी मांडलं.
“संजय राठोड हे शिवसेनेचे नेते आहेत. त्यामुळे त्याबद्दल शिवसेनाच भूमिका घेऊ शकते. माझं स्पष्ट मत आहे, जोपर्यंत चौकशीचा अहवाल येत नाही तोपर्यंत थोडसा पेशन्स ठेवावा लागणार. चौकशी पूर्ण न होता ज्यावेळी मीडिया त्यांना टार्गेट करते तेव्हा ती व्यक्ती थोडी बाजूला राहण्याचा प्रयत्न करत असते. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी वक्तव्य केल्यानंतर तेही जरा बाजूला होते”, अशी भूमिका त्यांनी मांडली.
“याप्रकरणाची चौकशी कधी पूर्ण होणार? हे ते पोलीस सांगतील. मी सांगायला काही होम मिनिस्टर नाही. मी पुण्याला गेल्यानंतर त्यांना विचारेल, चौकशी कधी होईल? पत्रकारांना प्रश्न पडलेला आहे. जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत चौकशी सुरू राहील”, असं अजित पवार म्हणाले.
“संजय राठोड गुरुवारी खुलासा करणार आहेत, असं मला कळलं. त्यांच्यावर आरोप झाले आहेत त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे, असं आम्ही सांगितलं आहे. माझं त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही”, असं त्यांना स्पष्ट केलं.
“पुणे शहर पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. पोलिसांनी काही लोकांना ताब्यात घेतलं आहे. तिच्या वडिलांनी ही सांगितलं आहे. मात्र चौकशी झाली नाही तर निष्पाप लोकांना त्याचा त्रास नको”, असंदेखील ते यावेळी म्हणाले.
“संजय राठोड यांना संशयाच्या भोवऱ्यात टाकनं योग्य नाही. एखाद्या मोठ्या व्यक्तीचे नाव आल्यानंतर वेगळी प्रसिद्धी दिली जाते. राजकीय जीवनात ते काम करणारे आहेत. धनंजय मुंडे यांच्याबद्दल ही असंच झालं. त्या मुलीला व्यवसाय करायचा होता. तिचे वडिलही म्हणाले, ती मुलगी आमचा मुलगा होता. तिला पोल्ट्रीचा व्यवसाय सुरू करायचा होता. दुर्दैवाने बर्ड फ्लूचं संकट आलं. व्यवसाय अडचणीत आले. तिच्या वडिलांनी हे स्वतः सांगितलेलं आहे”, असं अजित पवार यांनी सांगितलं.
“पोलिसांनी आज एकाला ताब्यात घेतल आहे. पोलीस पोलिसांच्या पद्धतीने काम करत आहे. आताच्या घडीला ती व्यक्ती निराधार आहे. ही वस्तुस्थिती आहे. धनंजय मुंडे यांच्यावर सुद्धा अशाच प्रकारचे आरोप झाले होते. लगेच राजीनामा दिला असता तर त्यांची बदनामी झाली असती”, असं त्यांनी सांगितलं.