स्थैर्य, सातारा, दि. ०८ : नुकत्याच झालेल्या गुरूपौर्णिमेला अनेक भक्त व शिष्यांनी आपल्या गुरूचे स्मरण करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. या गुरूपौर्णिमेनिमित्त प्राथमिक शाळेतील शिक्षकांचे प्रश्न मांडून सातारा पंचायत समिती सदस्य संजय पाटील यांनी आगळीवेगळी गुरूपौर्णिमा साजरी केली. गेली तीन वर्षे शिक्षकांच्या प्रश्नांबाबत अधिकाऱ्यांनीच कानाडोळा केल्याचे उघड झाले.
याबाबत माहिती अशी की, सातारा पंचायत समिती अंतर्गत शिक्षण विभागात कार्यरत असलेल्या काही शिक्षक 31 मे रोजी सेवानिवृत्त झाले. काहींची बदली झाली. तर काहींना वैद्यकीय बिल मंजूर होण्यासाठी वाट पहावी लागत होती. सेवापुस्तिका न भरल्यामुळे अनेकांना शासकीय लाभ मिळत नव्हता. सदरची बाब सातारा पंचायत समितीचे सदस्य संजय पाटील यांना समजताच त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. ज्या गुरूंनी शिष्यांना विद्याविभूषित केले. अशा सुशिक्षीत वर्गाने अधिकार प्राप्त केल्यानंतर गुरूंना वंदन करून त्यांच्या समस्या सोडवून गुरूदक्षिणा द्यावी अशी अपेक्षा होती. या अपेक्षेला तडा गेल्याने अनेक शिक्षक वर्ग नाराज झालेले आहेत. गेल्या तीन वर्षात दोनशे शिक्षकांच्या बदल्या, सेवानिवृत्ती व पदोन्नती घडामोडी घडलेल्या आहेत. त्यांच्या सेवापुस्तकांमध्ये नोंद करून ती अद्ययावत करण्याऐवजी काही शिक्षकांना लॉकडाऊनच्या काळातच शालेय पुस्तकांसाठी तगादा लावला जात आहे. या प्रक्रियेविरोधात सातारा तालुक्यातील शिक्षण संघटनेने आक्रमक भूमिका घेण्याचे ठरवले आहे.
सातारा पंचायत समितीच्या कारभारामध्ये सातारचे खासदार श्री.छ.उदयनराजे भोसले, व आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या विचाराला मानणारे सदस्य आहेत. सदर मासिक सभेमध्ये शिक्षण विभागाची उजळणी घेतली जाते. पण शिक्षकांच्या प्रश्नांबाबत बे एके बे, बे दुणे चार याच्यापुढे पाढेच जात नाहीत. अशी स्थिती निर्माण झालेली आहे. यापूर्वीच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी चांगल्या पध्दतीने काम करून आपला नावलौकिक निर्माण केला होता. सध्याच्या अधिकाऱ्यांकडे काम करण्याची खूप मोठी क्षमता आहे. त्यांनी शिक्षकांना न्याय देण्यासाठी सहानुभूतीपूर्वक विचार करावा. त्यांच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत. तसेच भविष्यात शिक्षण विभागातच आणखी उच्च पदावर जाण्याची त्यांची लकब आहे. मग असे असताना शिक्षकांचे प्रश्न का सुटू शकत नाहीत? असे विचारणा होवू लागलेली आहे.
दरम्यान, स्वातंत्रदिनापूर्वी सेवानिवृत्त व बदली झालेल्या शिक्षकांच्या वैद्यकीय बिले, सेवापुस्तिका व पदोन्नती बाबत सर्व प्रश्न सोडविले जातील. असा विश्वास व्यक्त करण्यात आलेला आहे. स्वातंत्रदिनानंतर प्रश्न सुटले नाहीत तर शिक्षक संघटना तीव्र आंदोलन करतील. असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. तसेच शिक्षकांचे प्रश्न मांडल्या बद्दल सातारा पंचायत समिती सदस्य संजय पाटील व इतरांचे सातारा तालुक्यातील सेवा देणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षकांनी आभार मानले आहेत.