स्थैर्य, मालेगाव, दि. २३: सामान्य रुग्णालय, मसगा, सहारा कोविड सेंटरसह महिला रुग्णालयात आज कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी उपमहापौर निलेश आहेर, सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.किशोर डांगे, डॉ.हितेश महाले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे राहुल पाटील, महानगरपालिकेचे उपायुक्त रोहिदास दोरकुळकर, वैभव लोंढे, राजु खैरनार, रामा मिस्तरी, प्रमोद शुक्ला, विनोद वाघ, राजेश गंगावणे, छाया शेवाळे यांच्यासह सर्व स्वच्छता निरीक्षक व सफाई कामगार उपस्थित होते.
पावसाळ्यास लवकरच सुरवात होणार आहे. पावसाळ्यातील दुर्घटना टाळण्यासाठी प्रत्येक विभागाने दक्षता बाळगावी. समन्वयातून नदी, नाल्यांची नियमितपणे सफाई करण्यात यावी. तालुका, ग्रामपातळीवरील आराखडे अद्ययावत करावे. पावसाळ्यात साथीचे आजार पसरण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे आरोग्य यंत्रणांनी सतर्क राहावे. औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून घ्यावा. शुद्ध पाण्याचा पुरवठा होईल असे नियोजन करावे. अशा सूचना मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी दिल्या.
महिला रुग्णालयातील औषध भांडारातील औषध साठ्याची पडताळणी मंत्री श्री.भुसे यांनी केली. तर सामान्य रुग्णालयातील ड्रेनेज टाक्यांसह त्याची पाईपलाईन व इतर किरकोळ कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. कोणीही व्यक्ती रस्त्यावर कचरा टाकत असेल वा थुंकत असेल तर त्याला प्रत्येकाने प्रतिबंध करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.