25 हजारांची लाच घेताना दोघांना अटक सांगली पोलिसांनी म्हसवडमध्ये केली कारवाई

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. 4 : अवैध वाळू वाहतुक करण्यासाठी परवानगी मिळवण्यासाठी प्रांताधिकारी मॅडम यांना 25 हजार द्यावे  लागतील असे सांगून तक्रारदाराकडून प्रती महिना 25 हजार स्वीकारणार्‍या दोघांना सांगली  लाचलुचपत विरोधी पथकाने रंगेहाथ पकडले. अमोल आदिनाथ  खाडे वय 31 रा. पळशी, ता. माण आणि जयराम विठ्ठल शिंदे, वय 32 वर्षे रा. पानवण, ता. माण अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत माहिती अशी की, तक्रारदाराची साडेचार एकर शेतजमीन असून त्याकडेने ओढा जातो. या ओढ्यात वाळू उपसा करण्यासाठी प्रांताधिकारी मॅडम यांना 25 हजार द्यावे लागतील असे खाडे व शिंदे यांनी तक्रारदारास सांगितले होते. याप्रकरणी तक्रारदाराने दि. 1 रोजी अँटीकरप्शन विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार अँटिकरप्शनच्या पथकाने पडताळणी कारवाई केली असता अमोल खाडे यांनी जयराम शिंदे यांच्याकरवी 50 हजारांच्या लाचेची मागणी करून पहिला हप्ता 25 हजाराची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर म्हसवड येथे सापळा लावला. यावेळी पैसे स्वीकारताना पोलिसांनी दोघांना अटक केली. याप्रकरणी म्हसवड बसस्थानकासमोर जयराम शिंदे यास 25 हजार घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याविरोधात म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई अँटिकरप्शन ब्रँच (पुणे)चे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सुषमा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि गुरुदत्त मोरे, पोनि प्रशांत चौगुले, हवालदार संजय कलगुटगी, हवालदार संजय संकपाळ, अविनाश सागर, सलीम मकानदार, प्रितम चौगुले, चालक बालासाहेब पवार यांनी केली.

पैशाची मागणी करणारे खाजगी लोकं असले तरी याप्रकरणी मुळाशी जावून तपास करण्याची गरज आहे. कारण त्यांनी प्रांताधिकार्‍यांच्या नावावरून पैसे मागितले आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!