
स्थैर्य, फलटण, दि. ३० ऑगस्ट : एकीकडे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, यासाठी मुंबईत आंदोलन सुरू असताना, दुसरीकडे फलटण तालुक्यात ओबीसी संघर्ष समितीने आपल्या हक्काच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी एल्गार पुकारला आहे. ओबीसींचे आरक्षण अबाधित राहावे, या मागणीसाठी येत्या सोमवारी, दि. १ सप्टेंबर रोजी फलटण शहरात ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्याचा इशारा समितीने दिला आहे.
या आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी फलटण येथील संत सावतामाळी मंदिरात ओबीसी संघर्ष समितीची बैठक पार पडली. या बैठकीत, “आम्ही मराठा आरक्षणाच्या विरोधात नाही, मात्र त्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास आमचा ठाम विरोध आहे,” अशी एकमुखी भूमिका घेण्यात आली. सरकारने तातडीने जातनिहाय जनगणना करून मराठा समाजाला त्यांच्या लोकसंख्येनुसार स्वतंत्र आरक्षण द्यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
येत्या सोमवारी, दि. १ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता फलटण शहरातील नाना पाटील चौक येथे ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा या बैठकीत करण्यात आली. “ओबीसींच्या हक्कांवर गदा येत असताना आम्ही शांत बसणार नाही. शासनाने कोणाच्याही मागणीसाठी ओबीसी समाजाचा बळी देऊ नये,” असा खणखणीत इशाराही यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दिला.
या बैठकीसाठी ओबीसी संघर्ष समितीचे श्री. बापूराव शिंदे, श्री. भीमदेव बुरुंगले, डॉ. बाळासाहेब शेंडे, श्री. गोविंद भुजबळ, श्री. अमिरभाई शेख, फलटण तालुका शिवसेना प्रमुख श्री. पिंटू इवरे, श्री. संदीप नेवसे, श्री. मिलिंद नेवसे, श्री. दादासाहेब चोरमले, श्री. अजय माळवे, प्रा. बाळासाहेब घनवट यांच्यासह शेकडो ओबीसी बांधव आणि ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.