विकासकामांतून संगमनेर हे सुंदर शहर – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. 28 जून 2021 । शिर्डी। वैचारिक संस्कृती, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची परंपरा याचबरोबर सतत सुरु असलेली विकास कामे यामुळे संगमनेर शहर हे प्रगतशील ठरले आहे. सामान्य नागरिकांसाठी सुरक्षित व सुंदर शहर होत असल्याने नागरिकीकरणाचा वेगही वाढत असूनही नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी नगर परिषदेकडून सतत चांगले काम होत असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

मालदाड रोड व पावबाकी रोड विकास कामांचा लोकार्पण सोहळा आज महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार डॉ. सुधीर तांबे होते तर व्यासपीठावर नगराध्यक्ष सौ. दुर्गाताई तांबे, महानंदा चे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, उपनगराध्यक्ष शैलेश कलंत्री आदींसह प्रभागातील विविध कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी मंत्री श्री. थोरात म्हणाले की, 1992 पासून आमदार डॉ. तांबे यांनी नगराध्यक्ष पदाचा कार्यकाळ सुरू केला आणि तेव्हापासून नगरपालिकेला विकासाची दिशा मिळाली. ही विकासाची परंपरा कायम ठेवत संगमनेर शहरात मोठी विकास कामे उभी राहिली. क्रीडा संकुल, नाट्यग्रह, नगरपालिका, अद्यावत इमारती, हायटेक बसस्थानक यासह आता नव्याने विविध रस्ते मार्गी लागले असून संगमनेर शहरातील बायपासचे चौपदरीकरण होणार आहे. पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला आहे. सध्या संगमनेर शहरात असलेली विविध वृक्ष शहराची ओळख ठरत असून वृक्षांचे शहर म्हणून नावारुपास संगमनेर येत आहे. येथील शांतता व समृद्धता यामुळे शहरीकरणाचा वेग वाढत असूनही संगमनेर नगर पालिकेने नागरिकांना अत्यंत चांगल्या सुविधा दिल्या आहेत. अजूनही नव्याने विकास कामे होणारच आहेत. निधीची कमतरता भासणार नाही. या सर्व सुंदर, सुसंस्कृत वैभवशाली शहर निर्मितीच्या कामात सर्व नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.
आमदार डॉ. तांबे म्हणाले की, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहरातील विकास कामांसाठी सातत्याने मोठा निधी मिळाला आहे. यातून अनेक समाजोपयोगी व नागरिकांना सुविधा देण्याबाबतची कामे मार्गी लावली जात आहे. ही विकास कामे जपणे, शहराची स्वच्छता कायम टिकून ठेवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.

नगराध्यक्ष सौ. दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, कोरोनाच्या संकटात सर्व नगरसेवक, नगरसेविका सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी अत्यंत चांगले काम केले. रात्रंदिवस काम करताना शहरातील कोरोनाचा वेग नियंत्रणात राखला. आगामी काळातही आपल्याला जनहिताची कामे करावयाची असून यामध्ये नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन केले.

रणजितसिंह देशमुख म्हणाले की, संगमनेर शहरात सर्व रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण झाले असून यामुळे हिरवे शहर म्हणून संगमनेरचा लौकिक वाढतो आहे. स्वच्छता आणि हिरवाई यामुळे संगमनेरमध्ये सदैव प्रसन्न वातावरण निर्माण करण्यासाठी नगरपालिका सातत्याने काम करत असल्याचे ते म्हणाले. तर सभापती सौ. सुनंदाताई दिघे म्हणाल्या की, मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ सुधीर तांबे व नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहरातील विकासाची घोडदौड कायम सुरू आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेवक बाळासाहेब पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन आरिफ देशमुख यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!