
दैनिक स्थैर्य । 29 एप्रिल 2025। फलटण । देश विदेशातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आणि आध्यात्मिक शक्तिकेंद्र असलेल्या मोर्वे (ता. खंडाळा) येथील दत्त मंदिरात श्री दत्तराज आणि चिले महाराज यांच्या मूर्तीस चंदनउटी लेपण व फळांच्या आकर्षक सजावटीने नवा साज चढवण्यात आला.
श्री दत्त मंदिर संस्थानचे सद्गुरू ज्ञानोबा हिंगमिरे देव यांच्या कृपाशीर्वादाने झालेल्या या सोहळ्यानिमित्त दत्त महाराजांच्या मूर्तीप्रमाणेच चिले महाराजांच्या मूर्तीसाठीही रजतसिंहासन साकारण्यात आले. त्याचा अर्पण सोहळाही यावेळी विधिवत झाला. परब्रह्म सद्गुरू चिले महाराज पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त संस्थानच्या वतीने तीन दिवसीय श्री गुरुचरित्र, शिवलीलामृत पारायण घेण्यात आले. त्यामध्ये शेकडो भाविकांनी उपस्थिती लावून आत्मिक शांतीसाठी वाचन, ध्यान, जप आदी उपक्रमांत सहभाग घेतला.
पारायणास बसलेल्या सर्व भाविकांच्या निवास आणि फराळाची व्यवस्था संस्थानतर्फे करण्यात आली होती. या पारायण सोहळ्याची सांगता झाल्यानंतर महाआरती करण्यात आली. त्यानंतर सगुरू हिंगमिरे देवांच्या हस्ते संकल्प सोडून दोन्ही मूर्तीस चंदन लेपण करण्यात आले. उपस्थित सर्व भाविकांनाही यावेळी महाराजांच्या पादुकांना चंदनलेपण करण्याचा आनंद घेता आला.
त्यानंतर आंबा, अननस, द्राक्ष, कलिंगड, केळी, संत्री, मोसंबी, पेरू, काकडी, टरबूज, सफरचंद, ड्रॅगनफ्रूट अशा नानाविध फळांद्वारे दोन्ही मूर्तीच्या गाभार्यांसमोर आकर्षक सजावट करण्यात आली. त्याचबरोबर सभोवती मोगरा, अबोलीच्या पुष्पमाला आणि आसनावर गुलाबपुष्पांची मांडणी करण्यात आली होती. हा सर्व सोहळा झाल्यावर भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी सद्गुरू हिंगमिरे देवांच्या दर्शनासाठीही भाविकांनी मोठी गर्दी केली होती.