
दैनिक स्थैर्य | दि. 27 जून 2025 | फलटण | राज्य शासनाने घेतलेल्या विविध लोककल्याणकारी योजना, उपक्रम, अभियानाची माहिती देणाऱ्या संवादवारी’ प्रदर्शनाचे उद्घाटन वारकरी महादेव चौगुले यांच्याहस्ते झाले. संवाद वारी प्रदर्शनाचे फलटण येथे आयोजन करण्यात आले आहे. या उद्घाटन प्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, उपसंपादक राहुल पवार यांच्यासह इचलकरंजी, चंदुर जिल्हा कोल्हापूर येथून आलेले वारकरी उपस्थित होते.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने आयोजित संवादवारी उपक्रम स्तुत्य असून राज्य शासनाने घेतलेल्या विविध लोककल्याणकारी योजना, उपक्रम, अभियान समाजातील तळागाळापर्यंत प्रसार करण्यास मदत होते. या उपक्रमास वारीत सहभागी अधिकाधिक नागरिकांनी भेट देऊन विविध योजनांची माहिती जाणून घ्यावी व योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांनी केले.
माहिती व जनसंपर्क विभागाने वारीच्या मुक्कामाच्या ठिकाणी अत्यंत चांगले प्रदर्शन उभे केले आहे. या प्रदर्शनातून वारकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ होणार आहे. या प्रदर्शनातून शासनाच्या विविध योजनांची माहिती झाली या योजनांचा लाभ मीही घेणार आणि दुसऱ्यांनाही घ्यायला मदत करणार, असे वारकरी महादेव चौगुले यांनी प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी सांगितले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मला लाभ मिळत आहे. या पैशांचा उपयोग मी देवदर्शनासह माझ्या औषधांसाठी करते. ही योजना यापुढेही अखंड सुरू राहावी व आम्हाला याचा लाभ मिळावा अशी अपेक्षा इचलकरंजी येथील महिला वारकरी संगीता ढवळशंक यांनी व्यक्त केली.