दैनिक स्थैर्य | दि. १४ नोव्हेंबर २०२४ | फलटण | फलटण शहर व तालुक्याचा ठप्प झालेला विकास पुन्हा गतिमान करण्यासाठी फलटण – कोरेगाव विधान सभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार सचिन सुधाकर पाटील यांच्या घड्याळ चिन्हा समोरील बटण दाबून त्यांना बहुमताने विजयी करा असे आवाहन फलटण नगर परिषदेतील माजी विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी केले.
निंबळक, ता. फलटण येथे राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना एकनाथ शिंदे गट व मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार सचिन पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सभेत समशेर बहाद्दर नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी सातारा जिल्हा सहकारी बँकेचे संचालक श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर उद्योजक राम निंबाळकर, श्रीमंत धीरेंद्रराजे खर्डेकर, सौ. प्रतिभा शिंदे, फलटण पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय सोडमिसे, संजय कापसे, सुशांत निंबाळकर यांच्यासह निंबळक, शेरे – शिंदेवाडीचे सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य आणि मतदार बंधू – भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या खासदारकीच्या कार्यकाळात केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना प्राधान्याने राबवून माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी तालुक्याचा सर्वांगीण विकास गतिमान करण्याचा यशस्वी प्रयत्न केला, मात्र कोरोना कालावधीत विकास कामांऐवजी बाधीत रुग्णांना उपचाराच्या सुविधा उपलब्ध करुन देणे, हॉस्पिटल मध्ये बेड उपलब्ध नसल्याने तात्पुरती उपचार केंद्र, तेथील रुग्णांना जेवणासह आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करुन द्यावी लागल्याने विकास प्रक्रिया काही काळ खंडित झाल्याने काही कामे मागे राहिली असल्याचे समशेर बहाद्दर नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पाहिलेले विकासाचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी सचिन पाटील यांना बहुमताने विधानसभेत पाठवा त्यानंतर त्यांच्या माध्यमातून विकास प्रक्रिया पुन्हा गतिमान करुन राज्यातील सर्वांगीण विकासात अग्रेसर मतदार संघ घडविण्याची जबाबदारी आमच्यावर सोपवा असे मत समशेर बहाद्दर नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
गुणवरे जिल्हा परिषद गटात विविध विकास कामे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विकास निधीतून व शासकीय योजनांमधून त्यांनी उपलब्ध करुन दिलेल्या निधीतून मोठी विकास कामे करता आली, त्यामध्ये रस्ते, ओढे, नाले, नदीवरील पूल अशा अनेकविध कामांचा समावेश असल्याचे निदर्शनास आणून देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवीत असलेले सचिन पाटील यांना विजयी करुन येथील विकास प्रक्रिया ना. अजित पवार व माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा गतिमान करण्याची ग्वाही देत सचिन पाटील यांना बहुमताने निवडून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर यांनी केले.
फलटण पूर्व भागात विकासाची गंगा आणण्यामध्ये आपण कमी पडलो नाही, त्याचबरोबर इथून पुढे तर अनेक मोठ मोठी विकास कामे केली जातील, फलटण तालुक्याच्या सर्वांगीण विकासामध्ये ना. अजित पवार व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण आघाडीवर राहुन काम करणार असल्याने विकासाचा बॅकलॉग नक्की भरुन काढू असा विश्वास श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर यांनी यावेळी दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि मित्र पक्षाचे उमेदवार सचिन पाटील यांना आपण सर्वांनी भरघोस मतांनी निवडून द्यायचे आहे, अडीच वर्षांमध्ये माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण शहर व तालुक्यामध्ये विविध प्रकारची विकास कामे मार्गी लावली असून सचिन पाटील यांना निवडून द्या उर्वरित कामे निश्चित पूर्ण करण्याची खात्री युवा नेते श्रीमंत धीरेंद्रराजे खर्डेकर यांनी दिली.